गोव्यातील कॅसिनो सोमवारपासून सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची दूसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे गोव्यात गेले 5 महीने बंद असलेले कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर, रिव्हर क्रूज सोमवारपासून 50 टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत. या ठिकाणी जाणाऱ्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण किंवा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहेल, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी दिली आहे. याबाबतची नियमावली लवकरच जारी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ईडीएम पार्ट्या, नाईट क्लब यांना तूर्तास परवानगी दिलेली नाही. शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय कृतिदलाच्या पुढील बैठकीनंतर घेतला जाईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले आहे. गोव्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळेच सरकारने कृतिदलाच्या शिफारशीनुसार पर्यटनाशी संबंधित उद्योग, व्यवसायासाठी नियमावली जारी करून ते सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसारच सोमवारपासून कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर, रिव्हर क्रूज 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत.

ऑक्टोबरपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात यावेत, अशी सूचना कृतिदलाने केली आहे. पण, कृतिदलाच्या पुढील बैठकीत आढावा घेऊन यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे सावंत म्हणाले. आठवी ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात यावे. प्राथमिक शाळांच्या प्रत्यक्ष वर्गांबाबत दिवाळीनंतर कोविड परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात यावा. कॅसिनोंसह पर्यटन उद्योगाशी संबंधित सर्वच उपक्रम 50 टक्के क्षमतेने सोमवारपासून सुरू करावेत, असा प्रस्ताव कोविड संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृतिदलाने सरकारला सादर केला असल्याची माहिती कृतिदलाचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी दिली.

कृतिदलाची 24 किंवा 25 सप्टेंबरला पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात येईल. त्यानुसार सरकारला शाळा सुरू करण्याबाबत पुढील सूचना सादर केल्या जातील, असे साळकर म्हणाले. रशियातून येणाऱ्या पर्यटकांच्या चार्टर विमानांना गोव्यात उतरण्यास परवानगी देण्यात यावी, असे पत्र आपण पंतप्रधान कार्यालयास (पीएमओ) पाठवणार असल्याची माहिती मंत्री मायकल लोबो यांनी दिली आहे. कोविडमुळे कोलमडलेली राज्याची आर्थिक स्थिती लवकरात लवकर रुळावर येण्यासाठी राज्यातील पर्यटन व्यवसाय, उद्योग सुरू होण्याची आवश्यकता आहे. विदेशी पर्यटक गोव्यात आल्याशिवाय पर्यटनास चालना मिळणार नाही,असे लोबो म्हणाले. कॅसिनो आणि पर्यटन उद्योग सुरु झाल्यास कोरोना पुन्हा वाढू नये यासाठी मार्गदर्शक तत्वे पाळून आवश्यक ती खबरदारी सरकार आणि पर्यटन व्यावसायिकांना घ्यावी लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.