विचित्र घटना! उंट महिलेवर बसला, सुटकेसाठी उंटाच्या गुप्तांगाला चावा

अमेरिकेतील लुईझियाना प्रांतामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. इथल्या आयबरव्हील भागात असलेल्या प्राणी संग्रहालयात ही घटना घडली आहे. फ्लोरीडावरून प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी एक महिला तिच्या कुटुंबासह आली होती. ही महिला उंटासाठीच्या संरक्षित जागेमध्ये सरपटत गेली होती. बंदिस्त जागेत महिला घुसल्याने उंट बिथरला होता. अचानक तो या महिलेवर बसला

जो उंट या महिलेवर बसला होता, त्या उंटाचं नाव कॅस्पर असं आहे. कॅस्पर हा अतिशय शांत असून त्याने आजपर्यंत कोणालाही इजा पोहचवलेली नाही असं संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्याने जी कृती केली ती स्वाभाविक होती असंही त्यांचं म्हणणं आहे. या उंटाचं वजन जवळपास जवळपास 272 किलो आहे.

ज्या महिलेवर कॅस्पर बसला होता तिच्या नवरा कुत्र्याला खायला घालत होता. कुत्र्याचं खाणं त्याने उडवलं जे कॅस्परच्या बंदिस्त जागेत जाऊन पडलं ज्यामुळे कुत्रा उंटाच्या पिंजऱ्यात गेला होता. त्याला काढण्यासाठी ही महिला जाळीच्या मोकळ्या जागेतून सरपटत आत गेली. अस्वस्थ झालेल्या उंटाने या महिलेवर बसकण मारली. प्रचंड वजन अंगावर आल्याने आणि उंटाच्या केसांमुळे ही महिला गुदमरायला लागली होती. उंटापासून सुटका व्हावी यासाठी तिने कॅस्परच्या गुप्तांगाचा चावा घेतला. संग्रहालयाच्या सुरक्षा रक्षकांना जेव्हा ही बाब कळाली तेव्हा त्यांनी तत्काळ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी या महिलेला आणि तिच्या नवऱ्याला सक्त ताकीद दिली आहे. कुत्र्यावर नीट लक्ष ठेवण्याचेही त्यांनी या दोघांना आदेश दिले आहेत.

प्राण्यांसाठीच्या जागेमध्ये जाऊ नये अशा स्पष्ट सूचना देणारे फलक इथे दर 10 फुटांवर लावण्यात आलेले आहेत. तरीही ही महिला या उंटाच्या पिंजऱ्यामध्ये शिरली. संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत बोलताना सांगितले की जर या महिलेचा कुत्रा आतमध्ये अडकला असल्याचे तिने आम्हाला सांगितले असते तर आम्ही त्याला व्यवस्थित बाहेर आणला असते. स्वत:हून या महिलेला उंटाच्या पिंजऱ्यात शिरण्याची गरजच काय होती असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी विचारला आहे. या घटनेबद्दल संग्रहालय कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आलेली नाहीये, कारण यामध्ये त्यांची कीहीह चूक नाहीये.

या संग्रहालयाच्या व्यवस्थापक पॅमेला बॉसिअर यांनी या घटनेबाबत बोलताना सांगितले की कॅस्पर हा अत्यंत शांत आहे. तुम्ही कोणत्याही प्राण्याची मुद्दाम खोड काढलीत तर तो भडकणारच आणि स्वत:च्या बचावासाठी त्याला जे जमेल ती गोष्ट तो करणारच. या संग्रहालयामध्ये अनेक प्राणी ठेवण्यात आले आहेत. यामध्ये वाघाचाही समावेश आहे. वाघासारखे प्राणी संग्रहालयात ठेवल्याने स्थानिक प्राणीप्रेमींनी या संग्रहालयाला विरोध दर्शवलेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या