‘कॅट’ परीक्षेत महाराष्ट्राचा झेंडा, देशातील ‘टॉप 10’ मध्ये चार विद्यार्थी महाराष्ट्राचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) संस्था आणि अन्य 115 संस्थांमधील व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (कॅट) निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पैकीच्या पैकी म्हणजेच 100 पर्सेंटाईल मिळवणाऱया ‘टॉप 10’ विद्यार्थ्यांमध्ये चार विद्यार्थी हे महाराष्ट्रातील आहेत. इतर विद्यार्थी हे झारखंड, कर्नाटक, तामीळनाडू, तेलंगणा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील आहेत. उल्लेखनीय म्हणजे टॉपर ठरलेले हे सर्व विद्यार्थी इंजिनीयरिंग क्षेत्रातील आहेत.

यंदाची कॅट परीक्षा आयआयएम-कोझिकोडे संस्थेने 24 नोव्हेंबर 2019 रोजी घेतली होती. 2 लाख 9 हजार 926 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. ‘टॉप 10’ विद्यार्थ्यांमध्ये गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही मुलांचाच समावेश आहे. त्यातील सहा विद्यार्थी हे आयआयटी, दोन हे एनआयटी, एक जाधवपूर विद्यापीठ तर अन्य एक विद्यार्थी दुसऱया विद्यापीठातील आहे. 21 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत 99.99 पर्सेंटाईल मिळवले आहेत. त्यातील 19 विद्यार्थी हे इंजिनीयरिंग क्षेत्रातील आहेत. कॅट परीक्षेतील गुण हे पुढील तीन वर्षांपर्यंत व्यवस्थापन अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ग्राह्य धरले जातात.

आयआयटी मुंबईतील शेवटच्या वर्षात शिकणाऱया दिल्लीच्या राहुल मांगलिक आणि नागपूरच्या सोमांश चोरडिया या दोन विद्यार्थ्यांनीही कॅट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. राहुलने 99.99 पर्सेंटाईल तर सोमांशने 100 पर्सेंटाईल मिळवले. सोमांशला आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे. ‘राहुल आणि मी या परीक्षेला सामोरे जाताना मॉक टेस्ट तसेच गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांवर जास्त भर दिला होता आणि आम्ही दोघेही एकमेकांच्या कामगिरीचा वेळोवेळी आढावा घेत होतो. बिझनेस मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकतो. त्यासाठीच आम्ही कॅट परीक्षा दिली’ असे सोमांशने सांगितले.