मोकाट फिरणाऱ्या गुरांचा नगर परिषदेकडून होणार लिलाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवरुख शहरात मोकाट फिरत असलेल्या गुरांबद्दल संबंधित मालकांकडून बेफिकिरी दाखविण्यात येत असताना अशा मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नागरिकांतून करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून शहरात मोकाट फिरत असलेल्या दोन गुरांचा नगर परिषदेने 19 मे रोजी जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात मोकाटपणे फिरणाऱ्या गुरांचा नागरिकांना मोठा त्रास होत असताना काही गुरांचे मालक नगर परिषद वारंवार करीत असलेल्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नेहमीच दिसून येत आहे. ही मोकाट गुरे आठवडा बाजारात फिरत असताना व गुरांत लागणाऱ्या झुजींमुळे नागरिक जखमी होण्याची भीती असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात होते.

नागरिकांच्या तक्रारीनंतर नगर परिषद प्रशासनाने मोकाट गुरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्याची कारवाई केलेली आहे. मात्र, त्यांना वैरणाचा खर्च नगर परिषदेलाच सोसावा लागत आहे. त्यातच मोकाट गुरांचे मालक दंड भरून गुरे नेण्यासाठी येत नसल्याने नगर परिषद प्रशासनाने आता लिलावाचा निर्णय घेतला आहे.