मोदींवर टीका केली म्हणून…सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयचे छापे

केंद्र सरकारने जवानांना एअरलिफ्ट केले नाही. त्यामुळे  पुलवामा हल्ल्यात जवानांचा बळी गेला. किरू हायड्रो पॉवर प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाला, अशी स्पष्ट भूमिका मांडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराचे जाहीर वाभाडे काढणारे जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर अखेर सूडबुद्धीने केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली. मलिक यांच्या दिल्ली, गुरुग्राम आणि बागपत येथील घरांवर सीबीआयने छापेमारी केली.

सत्यपाल मलिक हे 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 या काळात जम्मू-कश्मीरचे राज्यपाल होते. त्यांच्या कार्यकाळात किरू हायड्रो इलेक्ट्रीक पॉवर प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी दोन फाईल्स आल्या. या दोन फाईल मंजूर करण्यासाठी आपल्याला 300 कोटींची लाच देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. मात्र आपण हे आमिष धुडकावून लावले असा सनसनाटी गौप्यस्पह्ट सत्यपाल मलिक यांनी केला होता. 2022मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. गेल्या महिन्यात सीबीआयने जम्मू-कश्मीरातील आठ ठिकाणांवर छापे टाकले होते.

गैरव्यवहार उघड करणाऱ्यावरच छापे

किरू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचे सत्यपाल मलिक यांनीच उघड केले. मात्र, पंतप्रधान मोदींवर टीका केली म्हणून भ्रष्ट्राचार उघड करणाऱ्यावरच सीबीआयने छापेमारी केली आहे.

मलिक यांच्या दिल्लीतील आर. के. पुरम, द्वारका आणि एशियन गेम्स व्हीलेज येथील घरांवर सीबीआयने छापे टाकले. तसेच गुरूग्राम आणि उत्तरप्रदेशातील बागपत येथील मुळ घरावर तीन तास छापेमारी सुरू होती.

काय आहे प्रकरण?

जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्हय़ात चिनाब नदीवर 624 मेगावॅटचा किरू हायड्रो पॉवर प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने 7 मार्च 2019 ला मंजुरी दिली. चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्टस प्रा. लिमिटेडद्वारे किरू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्पामध्ये गुंतवणूक केली होती.

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 4287.59 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, या टेंडरींगमध्ये गैरव्यवहार झाल्याचे मलिक यांनी उघडकीस आणले. प्रकल्पासंबंधीत फाईल मंजूर करण्यास त्यांनी नकार दिला.

हुकूमशहाकडून मला घाबरवण्याचा प्रयत्न 

सीबीआयच्या छापेमारीवर सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी 3-4 दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये आहे. मात्र हुकूमशहाच्या आदेशानुसार सरकारी यंत्रणा माझ्या घरावर छापे टाकत आहेत. माझा ड्रायव्हर आणि सहाय्यकाच्या घरावर धाडी टाकून छळ केला जात आहे. मला घाबरवण्याचा प्रयत्न होतोय. परंतु मी घाबरणार नाही, झुकणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतच राहणार असे मलिक यांनी एक्सद्वारे म्हटले आहे. या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याची पहिली तक्रार मी केली. भ्रष्टाचाऱ्यांऐवजी सीबीआय माझ्याच घरावर छापे टाकत आहे. सीबीआयला माझ्या 4-5 कुर्ता-पायजम्यांशिवाय काही मिळणार नाही, असे मलिक यांनी ठणकावले.

घोटाळय़ाचा आरोप केला म्हणूनच धाडी

सत्यपाल मलिक यांनी तुमच्यावर घोटाळय़ाचा आरोप केला म्हणून त्यांच्या घरावर सीबीआयची धाड टाकली. मग त्यांनी तुमचं पुलवामाचं भांडं फोडलं होतं त्याबद्दल तुम्ही खुलासा का करत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. अर्धसत्य चित्रपट होता त्याप्रमाणे अर्धवटरावाचे काम करू नका. सत्यपालांनी जे आरोप केले त्यातले पूर्ण सत्य पाळा. मलिक बोलले होते, सैन्याचा ताफा विमानातून जायला पाहिजे, पण त्याकडे दुर्लक्ष केले. सैनिकांना रस्त्याने पाठवले आणि त्यांच्यावर हल्ला झाला. वाटेत त्यांना मृत्यूने गाठले. हे कोणाचे पाप आहे? त्याची चौकशी का नाही? त्याच्यावर भाजप ब्र काढायला तयार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला.