समीर वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयचा मुंबईतील घरावर छापा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यासोबतच सीबीआयने समीर वानखेडे आणि अन्य दोन आरोपींच्या घरांवर छापे टाकले आहेत. याप्रकरणी दिल्ली, मुंबई आणि रांचीसह 29 ठिकाणी आरोपींचा शोध सुरू आहे. एनसीबीच्या दक्षता अहवालाच्या तथ्यशोधन अहवालाच्या आधारे सीबीआयने हा गुन्हा दाखल केला आहे. बेहिशीबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे. एनसीबीच्या रिपोर्टनंतर सीबीआयकडून ही कारवाई केली जात आहे.

समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला दोन वर्षांपूर्वी कथित क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी समीर वानखेडे हे मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी होते. त्यांनी आणि काही सहकाऱ्यांनी मुंबईच्या किनारपट्टीवर एका क्रूझ जहाजावर छापा टाकला होता. या प्रकरणात आर्यन खानने चार आठवडे तुरुंगात काढले. अखेर पुराव्यांच्याअभावी अँटी-ड्रग्स एजन्सीने त्याला सर्व आरोपांपासून मुक्त केले.

एनसीबीने समीर वानखेडे यांच्याविरुद्ध आर्यन खान प्रकरणाची दक्षता चौकशी तयार केली होती. ज्याचा अहवाल गृह मंत्रालयालाही सादर करण्यात आला होता. या अहवालात समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. वानखेडे यांच्यावर शाहरुख खानच्या कुटुंबीयांकडून 25 कोटी रुपयांची मागणी करून त्यातून 50 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.