
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करीत असलेले सीबीआयचे पथक शनिवारी पुन्हा एकदा सुशांतच्या वांद्रे येथील घरी गेल्याचे कळते. तपासाचा भाग म्हणून सीबीआयचे पथक त्याच्या घरी गेले असून गेल्या दोन आठवड्यात सीबीआयचे पथक दुसऱ्यांदा सुशांतच्या घरी गेले आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहेत. या तपासाचा भाग म्हणून सीबीआयचे पथक शनिवारी सुशांतच्या वांद्रे येथील माँट ब्लॅन्क अपार्टमेंट येथे दुपारी 11.30 वाजता पोहचले. सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी जे काही घडले त्या घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती करीत चौकशी केल्याचे कळते. यावेळी सुशांतचा कूक नीरज आणि केशव याच्यासह त्याचा सहकारी सिद्धार्थ पिठाणी हेदेखील उपस्थित होते.
यावेळी सीबीआयचे फाँरेन्सिक डिपार्टमेंटचे सहकारीदेखील हजर असल्याची माहिती पुढे आली आहे. घरातील चौकशी पूर्ण केल्यानंतर सीबीआयचे पथक पुन्हा एकदा छतावर जाऊन त्यांनी पाहणी केली. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर सीबीआयचे पथव सांताक्रुझ येथील डीआयडीओच्या गेस्ट हाऊसवर परतल्याचे सांगण्यात आले आहे.




























































