सीबीएसई प्रथम सत्र परीक्षेचा निकाल 10 जानेवारीला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या प्रथम सत्र परीक्षेचा निकाल 10 जानेवारीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांना नापास करण्यात येणार नसून फक्त मिळालेले गुण दर्शविले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचा एकूण निकाल हा प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र परीक्षा तसेच वर्षभरातील मूल्यमापनाच्याआधारे ठरविला जाणार असल्याचे सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे.

एमसीक्यू पद्धतीने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सीबीएसईच्या वतीने ऑफलाईन परीक्षा घेण्यात येत आहे. दहावीची परीक्षा संपली असली तर अद्याप बारावीच्या काही व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा सुरू असून 29 डिसेंबरला ही परीक्षा संपणार आहे. दरम्यान बोर्डाने शाळांकडून विद्यार्थ्यांच्या अंतर्गत परीक्षांची माहिती तसेच प्रथम सत्र परीक्षांचा निकाल गोळा करण्यास सुरूवात केली आहे. बोर्डाकडून अद्याप प्रथम सत्र परीक्षा निकालाच्या तारखेविषयी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या शाळांकडून विद्यार्थ्यांचे गुण कळविण्यात येत असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.

गैरहजर विद्यार्थ्यांना सरासरी गुण नाहीत

दहावी, बारावीच्या अंतिम निकालात प्रथम सत्र परीक्षेला 50 टक्के वेटेज देण्यात आले आहे. मात्र हे द्वितीय सत्र परीक्षा कशा पद्धतीने होतील यावर अवलंबून असेल. त्यानंतरच सीबीएसई बोर्डाद्वारे निकालाचा फार्मुला जाहीर करण्यात येईल. प्रथम सत्र परीक्षेसाठी 50 पैकी गुण दिले जाणार असून यात विविध विषयांतील शाळास्तरावर मिळणार्या अंतर्गत गुणांचादेखील सहभाग असणार आहे. तसेच प्रथम सत्राच्या परीक्षेसाठी गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांना कोणतेही सरासरी गुण दिले जाणार नाहीत. त्यांच्या निकालात गैरहजर असा शेरा दिला जाणार आहे. सीबीएसईच्या द्वितीय सत्राची परीक्षा एप्रिल-मे मध्ये घेण्याचे प्रस्तावित असून त्यावेळच्या कोरोना परिस्थितीनुसार परीक्षेचे भवितव्य अवलंबून असणार आहे.