
शाळेत वारंवार गैरहजर असणारे दांडीबहाद्दर विद्यार्थी दहावी, बारावीच्या परीक्षेला मुकणार आहे. 75 टक्केपेक्षा कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे.
सीबीएसई बोर्डाने शाळांसाठी याविषयीच्या सूचना जारी केल्या आहेत. फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया दहावी आणि बारावीच्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थितीची नोंद घेण्यास शाळांना सांगण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्क्यांपेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांना नियमानुसार परीक्षेला बसण्याची परवानगी मिळणार नाही.
- दहावीची परीक्षा 26 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान होणार आहे.
- बारावीची परीक्षा 22 फेब्रुवारी ते 30 मार्चदरम्यान होणार आहे.
…तरच परीक्षेला बसता येईल
वारंवार गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांकडे सुट्टीचे योग्य कारण असेल तरच त्यांना परीक्षेला बसू दिले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत योग्य कागदपत्रांसह बोर्डाकडे संपर्क साधायचा आहे. मुदतीनंतर येणाऱया विद्यार्थ्याबाबत विचार केला जाणार नाही, असेही सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे.
तर हॉलतिकीटही मिळणार नाही
75 टक्क्यांपेक्षी कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावी परीक्षेचे हॉलतिकीटही मिळणार नाही. अशा विद्यार्थ्यांची यादी शाळांना सीबीएसई बोर्डाकडे पाठवायची आहे. या यादीतील विद्यार्थ्यांबाबत अंतिम निर्णय 7 जानेवारीपर्यंत घेण्यात येणार आहे.

























































