
आरे कॉलनीतील मानवी वस्तीवरील बिबटय़ांचा वाढता वावर आणि हल्ल्यामुळे नागरिकांमधील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी आरेतील निर्जनस्थळी सोलर लाइट, सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे, तसेच आरेच्या मुख्य रस्त्यावर लवकरच लाइटची व्यवस्था आणि बिरसा मुंडा चौकात हायमास्ट दिवे बसवण्यात येणार आहेत.
आरे कॉलनीतील बिबटय़ांचा वावर, महिलांची सुरक्षा व स्वच्छतेसंदर्भात शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली आरे पोलीस ठाण्यामध्ये संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. बिबटय़ांचा माग घेण्यासाठी सेन्सर बसविणे शक्य आहे का तसेच सायरनची व्यवस्था करता येईल का अशी सूचना केली. घराजवळील वाढलेली झुडपे काढण्यासाठी महापालिकेने सहाय्य करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यावर तत्काळ मदत करण्याचे आश्वासन सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांनी यावेळी दिले. महिलांच्या संरक्षणासाठी आरे कॉलनीतील निर्जनस्थळी सोलर दिवे, आरे कॉलनी पोलीस ठाण्याला पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन देण्याचा व बिरसा मुंडा चौक येथे हायमास्ट दिवे बसविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आरे कॉलनीत वन विभागाची एक कायमस्वरुपी चौकी करण्याची सूचना आरे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक ज्योती देसाई यांनी केली.





























































