मॅनहोलमध्ये सीसीटीव्ही! मुंबईत शहर विभागात पालिकेचा पहिलाच उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षभरापासून पालिकेने पावसाळापूर्व कामे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबई शहर विभागातील ब्रिटिशकालीन मॅनहोल-पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सीसीटीव्ही घुसून मजबुती आणि अडथळे तपासणार आहे. या ‘ऑडिट’ अहवालानुसार आवश्यक दुरुस्ती आणि सफाईची कामे केली जाणार असल्यामुळे शहराची पाणी तुंबण्यातून सुटका होणार आहे. मुंबईत शहर विभागात पहिलांदाच असा उपक्रम राबकण्यात येत आहे.

पावसाळापुर्वीच्या कामात मॅनहोल आणि नालेसफाई सर्वाधिक महत्त्वाची असल्यामुळे पालिका यावर्षी अभिनव उपक्रम राबवत आहे. यामध्ये शहर विभागात मॅनहोल-पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी पहिल्यांदाच सीसीटीव्हीच्या माध्यमातून ‘टोपो’ सर्व्हे करण्यात येत असल्याची माहिती कार्यवाही अभियंता प्रशांत तायशेटे यांनी दिली. यामुळे मॅनहोल, पर्जन्य जलवाहिन्यांची स्थिती समजल्याने वेगाने काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा वेगाने होण्यास मदत होईले. जेणेकरून पाणी तुंबण्यापासून रहिवासी, प्रवासी, नागरिक आणि वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

असे होणार काम

एका क्राऊलरच्या माध्यमातून सीसीटीव्ही मॅनहोलमध्ये सोडला जाणार आहे. हा सीसीटीव्ही स्वयंचलित पद्धतीने आणि सुचनांनुसार पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये पुढे पुढे सरकणार आहे. कॅमेरा 360 अंशामध्ये फिरणारा असेल. ज्याचे थेट प्रक्षेपण बाहेरील स्क्रिनवर पाहता येणार आहे. यामध्ये पर्जन्य जलवाहिन्यांची स्थिती, मजबुती आणि अडथळेही समजणार असल्याचे प्रशांत तायशेटे यांनी सांगितले.

या कामात शहरातील सर्व मॅनहोलची माहिती एका ठिकाणी जमा होणार आहे. ही माहिती पालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध केली जाईल. ही माहिती एका क्लिकवर सर्वसामान्यही पाहू शकणार आहेत.

शहरात 38 हजार मॅनहोल

मुंबई महानगरपालिकेच्या एकटय़ा शहर विभागात 9 प्रभागात तब्बल 3750 हून जास्त मॅनहोल आहेत.
582 किमीचे पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे आहे. यामध्ये काही ठिकाणी अत्यंत दाटीवाटीने वाहिन्या आहेत.
पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये ब्रिटिशकालीन वाहिन्यांची संख्याही मोठी आहे. शिवाय पालिकेने तयार केलेल्या जलवाहिन्या आहेत.