
अदिती सारंगधर,[email protected]
नीना कुलकर्णी… मनस्वी कलाकार… तितक्याच मनस्वी श्वानप्रेमी… त्यांची रोझी, मस्तानी, क्लिओ आणि आता शॅम्पा….
काही माणसं अशी असतात ना, जी आपल्याला का, कशासाठी, नेमकी का, कशामुळे, कधीपासून असे कुठलेही फुटकळ प्रश्न न विचारता बाय डिफॉल्ट आवडतात. तशा मला नीनाताई आवडतात. कधी कसे भेटलो वगैरे (खरं तर निरुपयोगी) तपशील मला आठवतही नाही, पण प्रचंड प्रसन्न, सडेतोड तरीही आदरयुक्त भीती असणारं हुशार व्यक्तिमत्त्व. म्हणजे बोलायला संकोच वाटणार नाही, पण आब राखून बोलावं अशी श्वानप्रेमी, खरं तर पशुप्राणीप्रेमी, उत्तम अभिनेत्री.
‘‘आपण असं आर्टिकल करूया का?’’ प्रश्नाला मिळालेली उत्स्फूर्त दाद (‘ओके’रूपी). त्याच निमित्ताने मी घरी गेले तर दोन अत्यंत रुबाबदार सख्यांनी माझं स्वागत केलं. एक शॅम्पा आणि कोको. मग एका हातात चहा, एका हातात बिस्किट आणि अंगावर (माझ्या) पडलेली शॅम्पा, बाजूला नीनाताई, समोर सोहा (त्यांची मुलगी), टीव्ही टेबलच्या दोन कप्पे वर अत्यंत ऍटिटय़ूडमध्ये बसलेली कोको… साधारण अशा चित्रात आमच्या गप्पा सुरू झाल्या…
‘‘माझ्या वडिलांना डॉग्सची प्रचंड आवड, प्रेम. त्यामुळे अगदी लहानपणापासून आम्ही पेट्सबरोबर वाढलो, शिकलो आणि मोठे झालो. साधारण ७-८ वर्षांची असताना त्यांनी एक अल्सेशियन घरात आणली होती रोझी नावाची. रेस्क्युड् डॉग होती. अत्यंत अमानुषपणे कुणीतरी घराबाहेर बांधलं होतं. तिला मारायचे वगैरे. असो… तर ती घरी आली (आणली खरं तर) आणि आमच्या आईने सरळ नापसंती दर्शवली, पण एकदा ते आले की, त्यांना आपलं व्हायला आणि आपलंसं करून घ्यायला आणि आपल्यातलंच व्हायला वेळ लागत नाही. तशी रोझी आमचीच झाली. सो…अगदी लहानपणापासून ते कुठेतरी आत रुजलं होतं. नुसतं रुजलं नव्हतं तरी त्यांची काळजी घेणं, त्यांना समजून घेणं, समजावून देणं याची नकळत सवय झाली होती. कारण माझे वडील खूप जपायचे रोझीला… आणि ‘जसं पेराल तसं उगवतं’नुसार आमची रोझीसुद्धा खूप समजूतदार निघाली… घरातलं वातावरण तिनं समजून घेतले आणि रमली ती. १३ वर्षे आमच्या बरोबर असणारी माझी सखी/छोटी बहीण गेली.
‘‘ए ए काय काय चाल्लंय?’’ सोहा.
शॅम्पा भुंकत कोकोच्या मागे पळत होती आणि कोको तिच्या भुंकण्याला घाबरून वा इरिटेड होऊन घरभर अक्षरशः उडय़ा मारत होती आणि एक वेळ अशी आली की, कोको दमली बहुतेक आणि तिचे पेशन्स संपले. सटकन शॅम्पाला थोबाडीत लगावली आणि इतका वेळ घसा ताणून ओरडणारी शॅम्पा चिडीचूप… इतकं गमतीशीर दृश्य होतं ते…
हां, तर घरी कुणीतरी हवं होतं. मी शिवाजी पार्कला मैत्रिणीबरोबर वॉकला गेले असताना एक मनुष्य येऊन म्हणाले, एका बास्केटमध्ये ६-७ छोटी कुत्र्याची पिलं कुणीतरी टाकून गेलंय हो… जाऊन बघितलं तर चर्र झालं गं… राग आला… सगळी तर शक्य नव्हतं, पण एक उचलून सरळ घरी आणलं. दिलीप कुलकर्णी म्हणाला, ए बाई हे काय… महिनाभरच, त्याला घर मिळेपर्यंत आणलं असं स्वतःशीच वेळ मारत त्याला सांगितलं खरं, पण महिन्यानंतर एकाच सोफ्यावर दिलीप आणि मस्ती टीव्ही बघताना दिसले आणि हुश्श केले. मस्ती घरी १८ वर्षे राहिली आणि मी कुत्र्यांना घाबरायला लागले का अशा माझ्या भीतीचाही दी एण्ड झाला… घरातल्या शांत वातावरणाचं रूपांतर पुन्हा एकदा धिंगाण्यात झालं… कारण सोहा आणि दिविज लहान असल्यानं त्यांना अत्यंत आनंद झाला आणि मस्ती… मस्ती दिलीप कुलकर्णी ऑफिशियली झाली.
‘‘बाबा आणि आजोबा (नीनाताईंचे बाबा) यांनी मस्तीचं इतकं केलं की, मस्ती शेवटपर्यंत बाबांची बेबी राहिली, पण त्यांच्या अचानक जाण्यानं ती खूप खूप डिप्रेशनमध्ये गेली. पूर्वीसारखं खाईना, खेळेना आणि रमेना… साधारण २ वर्षांनंतर असं वाटलं की, आपल्याला घरातलं एकंदर वातावरण बदलायला हवं आणि अजून कोण इतका आनंद देणार म्हणून आणखी एका पेटचं आगमन झालं. आमची क्लिओ आमच्या मम्माची क्लिओ मस्तानी आणि क्लिओपात्राचं एक वेगळं गमतीशीर द्वंद्व सुरू झालं… ‘‘घरातली मी राणी आहे आणि तू फक्त आहेस’’ असं सतत मस्तीचं म्हणणं जणू क्लिओला क्लिओ सुंदर… म्हणजे सुंदरच… लॅब्रेडॉरचं पिलू… खरं तर रूपगर्विता म्हणून तिनं फिरायला हवं.
क्लिओच्या बाळंतपणात ११ पिलं दिली. तिनं आमच्या समोर मस्तीनं दाखवलेला समजूतदारपणा, मावशीच्या आवेशात येऊन पिलाकडं दिलेलं लक्ष… आणि पिलांनी त्याच मावशीला केलेलं सळो की पळो…. ते ३ महिने आमच्या लाईफमधले बेस्ट बेस्टेस्ट ३ महिने होते गं… डिलिव्हरीच्या वेळीचा एक किस्सा सांगते.
‘क्लिओ’चे दिवस पूर्ण झाले होते. रात्री ती अत्यंत अस्वस्थ वाटली म्हणून सोहानं बाहेरगावी मला फोन केला… तडक शूटिंग संपवून मी घरी परत आले. दरवाजात क्लिओ मला भेटली आणि रात्रभर कळवळत माझी वाट पाहणारी क्लिओ पुढच्या ५ मिनिटांत व्यायली…. आमच्या घरात नवीन बाळ आलं. असं होतं गं आमचं अनसेड, अनस्पोकन नातं… बोलताना किंचित ओलावलेल्या नीनाताईंच्या डोळय़ांच्या कडा मला जाणवल्या. क्लिओला जाऊन नुकतेच काही महिने झाले असले तरी ती आहे त्या घरात हे सतत इतकं जाणवत होतं ना!
क्लिओविषयी बोलताना मी दमत नाही आणि थांबत तर नाहीच नाही. हसत हसत ताई सांगत होत्या… मेरे जिगर का टुकडा, माझा जीव, माझं सग्गळं क्लिओ होती गं. कारण एक काळ असा होता की, फक्त ती माझ्यासाठी आणि मी तिच्यासाठी…. मुलं कामात… शूटिंग कमी. त्यामुळे तिला आंघोळ घालण्यापासून तिला खाली २-३ वेळा फिरायला नेण्यापर्यंत सग्गळं सगळं मी करायचे. आमचा एक स्पेशल बॉण्ड तयार झाला होता… तिनं माझ्याकडे बघितल्यावर तिला काय म्हणायचं मला कळायचं… आणि मी अपसेट असल्यावर मांडीवर येऊन मला कुरवाळत बसणं तिला जमायचं… तिच्याशिवाय किंवा तिच्या वजा आयुष्यात काहीच नव्हतं… मग ती एकटी असेल तर सुट्टी घेऊन घरी बसणं, रात्री उशिरापर्यंत पार्टीज्ना थांबणं, थांबत नाही म्हणून मैत्रिणीचे टोमणे (गमतीनं) सहन करणं हे जबाबदारी नसून आनंदाचं वाटायचे…
क्लिओच्या जाण्यानं अचानक एक पोकळी निर्माण झाली… अत्यंत हेल्दी असणारी क्लिओ १५ वर्षांनंतर अत्यंत शांतपणे वृद्धापकाळाने गेली… माझ्या मांडीवर…
पण तिच्याशिवाय छान जगता येईना. वरवर ‘‘चला आता घरी जायची घाई नाही’’, ‘‘आता लेट नाईट फिल्म पण बघू शकतो’’, ‘‘हव्वे तितके दिवस बाहेरगावी जाऊ शकतो’’, ‘‘सकाळी लवकर उठून फिरायला न्यावं लागणार नाही’’ असे वाटत असलं तरी आतमध्ये काही खरखुरं आनंदी/पिसफुल्ल आहोत असं वाटत नव्हतं.
सोहा म्हणाली, ‘‘आम्ही हॅपी आणि ओके राहायची ऍक्टिंग करतोय असं जाणवायला लागलं.’’ क्लिओच्या जाण्याला क्लोजर मिळालंच नव्हतं. दरम्यान माझी आई (नीताताईंची) आई गेली. त्यामुळे तर अजूनच कसंतरी व्हायला लागलं. कोको खरं तर माझं बाळ… मी कामानिमित्त गोरेगावला असल्यानं कोको माझ्याकडे… पण मी पुन्हा माहीमला आले. कोको बिचारी आम्हाला समजून आम्हाला शांत करण्याच्या नादात क्लिओसारखं वागायला लागली, पण… पण होताच.
आणि फायनली शॅम्पाच्या येण्यानं तो पण सुटला… निसटला… गेला… पळून गेला… गायब झाला… आणि मग सुरू झाली एक वेगळी धम्माल. कोको विरुद्ध शॅम्पा आणि आमची वेगळीच पळ्ळापळ… To be continued…
























































