सेलेब्रिटी चॉइस – पुस्तकांचं अजब विश्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रवीण तरडे
पुस्तकं ही माझा श्वास आहेत असं मला वाटतं. रोजच्या दिनक्रमात वाचनाला महत्त्वाचं स्थान आहे. पुस्तकं घेणं, वाचणं, एखाद्या विषयानुसार पुस्तकांचा संग्रह वाढवणं, आवडत्या पुस्तकाबाबत चर्चा करणं या माझ्या अत्यंत प्रिय गोष्टी. वाचनाचं बीज रुजलं ते आमच्या घरात होणाऱया धार्मिक ग्रंथांच्या वाचनामुळे. वडिलांचंही सतत वाचन सुरूच असायचं. त्यामुळे वाचनाचा संस्कार आपोआप रुजत गेला. तुकाराम गाथा आणि रामदास स्वामींचा ‘दासबोध’ या ग्रंथांचं वाचन सातत्याने माझ्याकडून झालं. सहज म्हणून वाचलेल्या या अभंगांमधून आणि ‘दासबोधा’तून माझ्यातला मी घडत गेलो, प्रगल्भ होत गेलो असं मी म्हणेन. ‘दासबोधा’तील मूर्खांची लक्षणं आपण वाचली तर निम्मा समाज शहाणा होईल, इतकं मार्मिक रामदास स्वामींनी लिहिलं आहे. गाथा म्हणजे तर तुम्हाला माणूस म्हणून घडवणारा ग्रंथच. लिखाणाची, वाचनाची आवड निर्माण होण्याचं मूळ या दोन ग्रंथांमध्ये आहे.

ललित वाचनाची पहिली पायरी म्हणजे पुलंचे साहित्य. त्यांच्या पुस्तकांनी प्रत्येक वाचकाला समृद्ध केलं, अंतर्मुख केलं. आजही कधी पुलंचं ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘गणगोत’ वा ‘बटाटय़ाची चाळ’ वाचायला घ्यावं आणि निरागस हसू लुटावं, इतकं खुसखुशीत त्यांचं लेखन आहे. व.पु. काळे हेदेखील त्यांपैकीच एक. मनाला भिडणारी त्यांची वाक्यं आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायला लावतात. त्यांचं ‘पार्टनर’, ‘वपुर्झा’, ‘दोस्त’ वाचताना नॉस्टॅल्जियाचा अनुभव आपण घेतोच. यानंतर आवडलेले अत्यंत प्रिय लेखक म्हणजे जी.ए. कुलकर्णी. गूढ, मॅजिकल रिऍलिझम म्हणजे काय हे त्यांचं ‘रमलखुणा’, ‘पिंगळावेळ’, ‘रक्तचंदन’ वाचताना आपण अनुभवतो.

अशा वैविध्यपूर्ण वाचनाची एकेक पायरी चढताना पुढे श्री. ना. पेंडसे, ह. मो. मराठे, आ. ह. साळुंखे अशा अनेक लेखकांचं साहित्य वाचलं आणि हे पुस्तकांचं जग किती विस्तारलेलं आहे याचा अनुभव येत गेला. आ. ह. साळुंखे सरांच्या पुस्तकांनी पारदर्शी विचार करायला भाग पाडलं. याचसोबत डी. डी. कोसंबी, वि. का. राजवाडेंचे लेखनही वाचले. त्यांच्या पुस्तकांनी माझ्यातली शोधक, चिकित्सक दृष्टीही विकसित होत गेली. याचसोबत बाबासाहेब पुरंदरेंचं जाणता राजा, फुलवंती वाचलं. वाचकाला वेगळ्या विश्वात घेऊन जाण्याचे त्यांचे कौशल्य कमाल आहे. भालचंद्र नेमाडेंचे ‘कोसला’ आणि ‘हिंदू’ वाचताना लेखकाचा आणि पर्यायाने वाचकाचा दृष्टिकोन कसा बदलत जातो याचा अनुभव घेता आला. या प्रवासात काव्यसंग्रहांचा वाटा तितकाच आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत आवडलेले लेखक म्हणजे एस. एल. भैरप्पा. त्यांची ‘मंद्र’, ‘आवरण’, ‘वंशवृक्ष’, ‘पर्व’ ही पुस्तकं कितीतरी वेळा वाचली असतील. अशी अनेक पुस्तकं वाचली आहेत, संग्रही आहेत. हे लेखक आणि त्यांची पुस्तकं हे आपलं खरं संचित आहेत. पुस्तकं तुम्हाला कधीच एकटं सोडत नाहीत. आपल्या ओंजळीत भरभरून दान ते टाकतात, फक्त आपल्याला ते स्वीकारता आलं पाहिजे.

(शब्दांकन : शुभांगी बागडे)