
पतीकडून मानसिक शारीरिक व लैंगिक छळ होत असल्याचा आरोप करत अभिनेत्री सेलिना जेटली हिने न्यायालयात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. याची दखल घेत न्यायालयाने ऑस्ट्रियन पती पिटर याला नोटीस बजावली आहे.
सेलिना जेटलीचा सप्टेंबर 2010 मध्ये पिटरसोबत विवाह झाला असून त्यांना तीन मुले आहेत. काम करण्याची इच्छा असूनही पतीने काम करण्यास दिले नाही तसेच दारू पिऊन तो मानसिक, शारीरिक आणि लैंगिक छळ करतो. तो आत्मकेंद्रित व रागीट आहे. तो मद्यपी असल्यामुळे मला सतत तणावात रहावे लागते, असे तिने याचिकेत म्हटले आहे.
घटस्फोटाचा अर्ज
पिटरने ऑस्ट्रियातील न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पोटगी म्हणून त्याच्याकडून 50.10 कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी तिने केली आहे. ऑस्ट्रियामध्ये राहत असलेल्या तीन मुलांशी संपर्क साधण्याची मागणीदेखील तिने केली आहे. दंडाधिकारी एस. सी. तायडे यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने पिटरला नोटीस बजावत सुनावणी 12 डिसेंबरपर्यंत तहकूब केली.

























































