
केंद्र सरकारने रविवारी पुन्हा एकदा ग्रामविकासाचा नारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ’स्वामित्व’ या नव्या योजनेचा शुभारंभ केला. योजनेंतर्गत पहिल्या दिवशी जवळपास 1 लाख गावकऱयांना ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड जारी करण्यात आले. या कार्डमुळे गावकरी आपल्या घरावर आपला अधिकार सिद्ध करू शकतील. याद्वारे त्यांना बॅंकांकडून सहज कर्ज मिळवता येणार आहे.
लोकनायक जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख या दोन महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून ही योजना लॉन्च करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी देशाच्या विविध भागांतील लाभार्थ्यांशी संवाद साधला. ही योजना ग्रामीण हिंदुस्थानात ऐतिहासिक परिवर्तन घडवेल. गावात राहणाऱया भाऊ-बहिणींना आत्मनिर्भर बनण्यासाठी योजनेची मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. योजनेचा शुभारंभ म्हणून महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांतील 763 गावांतील जवळपास एक लाख कुटुंबांना ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड पाठवण्यात आले. येत्या तीन-चार वर्षांत प्रत्येक गावातील प्रत्येक घरापर्यंत प्रॉपर्टी कार्ड पोहोचेल, असेही मोदींनी नमूद केले.
पहिले कार्ड पुण्यातील शेतकऱयाला
‘स्वामित्व’ योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर पहिले कार्ड मिळाले ते पुण्यातील कोढणापूर गावचे शेतकरी विश्वनाथ मुजूमले यांना.
गावात नेमकी क्रांती कशी घडेल?
– प्रॉपर्टी कार्डमुळे गावकऱयांना आपल्या घरावरील मालकीचा रितसर कागदोपत्री अधिकार मिळेल.
– गावकरी यापुढे सहजपणे पुठल्याही बॅंकेतून कर्ज वा इतर लाभ घेऊ शकतील. कर्ज प्रक्रियेतील अडचणी दूर होतील.
– गुंतवणुकीबरोबरच रोजगार-स्वयंरोजगाराचे नवीन मार्ग मोकळे.
– गावात मालकी हक्कावरून आपआपसात होणारे वाद टळतील.

























































