अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक, नऊ अधिकाऱ्यांचे पथक आज करणार पाहणी

राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी अखेर केंद्र सरकारच्या पथकाला मुहूर्त सापडला आहे. नऊ सदस्यांचे हे पथक आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची शक्यता आहे.

सोमवारी हे पथक मुंबईत दाखल झाले असून दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. या पथकाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशीही बैठकीत चर्चा केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे 68 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके वाया गेली आहेत, तर नागरी भागाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. तर केंद्र सरकारने 1566.40 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. मात्र, मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊनही केंद्रीय पथकाने अद्याप पाहणी केली नाही.

सोमवारी हे पथक मुंबईत दाखल झाले. केंद्रीय आंतरिक सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव आर. के. पांडे यांच्या नेतृत्वाखाली नऊ सदस्यांचे पथकाने मुंबईत बैठका घेतल्या. या पथकात कृषी विभागाचे संचालक डॉ. ए. एल. वाघमारे,  वित्त विभागाचे उपसचिव कंदर्प पटेल, जलशक्ती मंत्रालयाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग, रस्ते आणि महामार्ग वाहतूक विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल पांडे, ग्रामीण विकास मंत्रालयाचे अवर सचिव अभिषेक राज, ऊर्जा मंत्रालयाचे उपसंचालक करण सारेन, इस्रोचे संचालक डॉ. एसव्हीएसपी शर्मा, गृह मंत्रालयातील उपायुक्त आशीष गौर यांचा समावेश आहे.

या पथकाने दिवसभर मदत व पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांसह भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशी बैठका घेतल्या. तसेच हे पथक रात्री उशिरा कोणत्या भागाचा दौरा करणार आहे याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.