राजीनाम्याचे लोण नगर, मुंबईत; नाराज मुंडे भगिनींना पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे समर्थकांमध्ये निर्माण झालेली नाराजी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे या भगिनी तर प्रचंड नाराज आहेत. मुंडे समर्थक भाजपा पदाधिकाऱयांचे राजीनाम्याचे सत्र बीडमधून आता नगर आणि मुंबईपर्यंत पसरले आहे. नगर आणि मुंबईतील 30 भाजपा पदाधिकाऱयांनी राजीनामे देऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे.

प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा होती, परंतु मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा समावेश झालाच नाही. त्यानंतर मुंडे समर्थकांनी भाजपाच्या पदाचे राजीनामे देण्यास सुरुवात झाली. बीडमधील सर्व 11 तालुकाध्यक्षांसह 77 पदाधिकाऱयांच्या राजीनाम्यानंतर नगरमधील पाथर्डी-शेगाव पंचायत समितीचे सभापती सुनील दौड, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, धनंजय बडे यांच्यासह 25 पदाधिकाऱयांनी राजीनामे दिले आहेत. त्यानंतर लोकनेते गोपीनाथ मुंडे पाथर्डी तालुका विकास आघाडी स्थापन करूया असे संदेश सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत.

मुंबईतही मुंडे समर्थकांनी भाजपाला धक्का दिला आहे. भाजपाच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस आदिनाथ डमाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून नाराजीही व्यक्त केली आहे. मुंबईतील मुंडे यांच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱयांची बैठकही बोलवण्यात आली आहे. त्या बैठकीला प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे या मुंडे भगिनींबरोबरच राज्यातील राजीनामे दिलेले पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.