
सामना प्रतिनिधी । मुंबई
कफ परेड येथील बॅकबे रेक्लेमेशनजवळ सुमारे ३०० एकर क्षेत्रफळावर समुद्रालगत भराव टाकून भव्य उद्यान (सेंट्रल पार्क) पालिकेतर्फे उभारण्यात येणार आहे. विरोधकांनी या कामातही मोडता घालण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या कामासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव बहुमताने स्थायी समितीमध्ये मंजूर झाला. त्यामुळे या पार्कचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
कफ परेड येथे समुद्रात भराव टाकून भव्य उद्यान साकारण्यात येणार असून त्यामुळे मुंबईकरांना आणि पर्यटकांना भविष्यात विरंगुळय़ासाठी नवीन ठिकाण मिळू शकणार आहे. पालिकेचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या सेंट्रल पार्कसाठी समुद्रालगत भराव टाकण्यात येणार आहे. भराव टाकण्यासाठी मुंबई मेट्रोकरिता खोदण्यात येणाऱया भुयारांमधून तसेच इतर प्रकल्पांमधून निघणारी माती वा मुरुम वापरण्यात येणार आहे. ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था’व ‘राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था’ या दोन्ही संस्थांनी तयार केलेल्या मूल्यमापन अहवालाचा अभ्यास केला आहे. त्यावर आधारित अंमलबजावणी अहवाल व विविध अहवाल तयार करण्यासह निविदेचा मसुदा तयार करण्यासाठी सल्लागाराची निवड प्रशासनाने केली आहे. ‘मे. टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स लि.’ यांना सल्लागार नेमण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आला होता. त्यावेळी विरोधी पक्षाने राजकारण करीत या प्रस्तावला विरोध केला. राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांनी हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची उपसूचना मांडली होती, मात्र शिवसेना भाजपच्या सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले व हा प्रस्ताव अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंजूर केला. या कामाकरिता पालिका सल्लागाराला ३.८७ कोटी रुपये देणार आहे.
पार्कचे आरक्षण १९९१ पासून
दरम्यान, बॅकबे रेक्लमेशनमध्ये भराव टाकण्याचे व त्यात पार्कसाठीचे आरक्षण यापूर्वीच्या सन १९९१ च्या विकास आराखडय़ातच होते. नव्या २०३४ च्या विकास आराखडय़ातही हे आरक्षण तसेच ठेवण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सभागृहाला दिली. या पार्कमुळे आजूबाजूच्या परिसरावर काय परिणाम होतील याचा शॉर्ट टर्म व लाँग टर्म अभ्यास करून आघात मूल्यमापन अहवाल तयार केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

























































