
>>मंगेश मोरे
मध्य रेल्वे प्रशासनाने लोकलच्या मोटरमनवर पुन्हा चहूबाजूंनी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. सिग्नल तोडण्याचे प्रकार रोखण्याच्या नावाखाली मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्हीचा वॉच आणि ‘सिलास’सारखी उपकरणे बसवून सूचनांचा भडिमार केला जात आहे. तसेच सिग्नलजवळ येताच हात वर न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात येत आहे. याचा मानसिक त्रास मोटरमनना होत असून कारवाईची भीती आणि सूचनांचा भडिमार झेलत ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रीत कसे करायचे, असा प्रश्न मध्य रेल्वेचे मोटरमन विचारत आहेत.
अलीकडेच मध्य रेल्वे प्रशासनाच्या दडपशाहीविरोधात मोटरमन संघटनांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले होते. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोटरमनना सिग्नल जवळ येताच हात वर करण्याची सक्ती राहणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र आता कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत त्यासाठी दबाव टाकला जात आहे. त्यात हयगय केल्यास ‘ए’ ग्रेडमधून ‘सी’ किंवा ‘डी’ ग्रेडमध्ये आणले जाईल, असा इशारा मोटरमनला देण्यात येत आहे. दुसरीकडे मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर, ‘सिलास’ द्वारे सातत्याने सूचना, ‘येलो’ सिग्नल असताना ट्रेन पुढे नेल्यास ‘एडब्ल्यूएस’चा होणारा गोंगाट यामुळे मोटरमनला ट्रकवर लक्ष केंद्रित करणे मुश्किल बनले आहे. प्रशासनाच्या नवनव्या फतव्यांमुळे त्रासलेले अनेक मोटरमन स्वेच्छानिवृत्तीच्या तयारीत आहेत. यापूर्वी बायोमेट्रिक हजेरी, वेतन कपात, मोबाईलवरील इंटरनेट सार्फिंगवर करडी नजर अशा प्रशासनाच्या धोरणांविरोधात मोटरमन संघटनांनी आवाज उठवला होता.
मोटरमनना होत असलेला त्रास
n ‘येलो’ सिग्नल असताना लोकल ट्रेन पुढे गेल्यास ‘सिलास’ उपकरण तीन भाषांमध्ये वारंवार सूचना देते. ‘ग्रीन’ सिग्नल मिळाल्यानंतरही एका सिग्नलपासून दुसऱ्या सिग्नलपर्यंत ‘सिलास’ची बडबड सुरू असते.
n डेस्टिनेशन स्टेशनवर ‘येलो’ सिग्नल पार करून पुढे जाण्यास मुभा असते. तेथेही ‘सिलास’ची बडबड सतत ऐकावी लागते. याची डोकेदुखी मोटरमनना लोकल ट्रेन चालवताना सहन करावी लागत आहे.
n ‘सिलास’च्या सूचना ऐकण्याबरोबरच मोटरमनना ऑडिओ व्हिज्युअल पुश बटणदेखील सिग्नलच्या ठिकाणी ऑन-ऑफ करावे लागते.
रेल्वे प्रशासन नवनवीन फतवे काढून दबाव टाकत आहे. आम्हाला मुक्त वातावरणात डय़ुटी करायला दिली जात नाही. प्रशासन स्वस्थ जगू देत नाही आणि मरूही देत नाही. प्रवाशांच्या सुरक्षेचे गांभीर्य आम्हाला आहे. मात्र त्या नावाखाली आमचे स्वातंत्र्य चिरडणे चुकीचे आहे. अशा वातावरणात काम करणे नकोसे झाले आहे.
n मध्य रेल्वेचे एक मोटरमन
प्रशासनाकडून हायटेक प्रणालींचा वापर होत आहे हे स्वागतार्ह आहे. मात्र त्याआडून मोटरमनवर दबाव टाकण्याचे सत्र थांबवावे. प्रत्येक सिग्नलच्या आधी पीएटीएम हॅण्डल बसवावे. मोटरमनवर वॉच ठेवण्यासाठी कोटय़वधीचा खर्च केला जातो. त्याऐवजी लोकलचा अपघात रोखण्यासाठी ‘टक्करविरोधी उपकरण’ बसवावे. – प्रशांत कमानकर, रनिंग ब्रँचप्रमुख, रेल कामगार सेना































































