
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईत येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस कोसळण्याच्या शक्यतेमुळे एकट्या मध्य रेल्वेने रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बुधवारी सकाळच्यावेळात प्रवाशांचे हाल झाल्याने बोंबाबोंब झाली. अखेर रेल्वे प्रशासनाला जाग आली आणि दुपारी 12 वाजता त्यांनी रविवारचे वेळापत्रक रद्द केले.
मुसळधार पावसाच्या मध्य रेल्वेने बुधवारी रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. पण रात्री उशिरा घेतलेला निर्णय अनेक लोकांपर्यंत पोहोचलाच नाही आणि पाऊस थांबलेला असल्याने लोकांनी ऑफिस गाठण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दी केली. मात्र तिथे गेल्यावर रविवार प्रमाणे गाड्या धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. ऑफिसच्या गर्दीवेळात कमी गाड्या आणि त्यातही डाऊन मार्गावरील काही गाड्या उशिराने धावल्याने आपोआपच अप गाड्यांवर देखील त्याचा परिणाम झाला. त्यामुळे गाड्यांमध्ये गर्दी ही वाढतच गेली. सामना ऑनलाईनने यासंदर्भातील बातमी सर्वात जलद गतीने देत प्रवाशांचे प्रश्न उचलून धरले. त्यानंतर वृत्तवाहिन्यांनी देखील प्रवाशांचे हाल दाखवण्यास सुरुवात केली. अखेर मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय रद्द केल्याचे जाहीर केले. हा निर्णय उशिराने जाहीर केल्याने सकाळच्या वेळात प्रवाशांना त्याचा फटका बसला तरी कामावरून परतताना तरी प्रवास चांगला होईल अशी आशा अनेकांनी व्यक्त केली आहे.































































