
सामना प्रतिनिधी, मुंबई
मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील रोजच्या 1774 लोकल फेऱयांच्या व्यापामुळे रात्री लोकलची धडधड थांबली की ट्रॅकची देखभाल करणाऱ्या महाकाय मशीनची घुरघुर सुरू होते. हे कार्य करण्यासाठी मध्य रेल्वेकडे अत्याधुनिक हाय आऊटपुट बलास्ट क्लिनिंग मशीन दाखल झाली असून तिच्या समावेशामुळे ट्रॅक मेंटेनन्सचे काम दुप्पट वेगाने होईल.
मुंबईची उपनगरीय लोकल रात्री उशिरापर्यंत धावत असते. त्यानंतर रात्री 1 ते 1.30च्या सुमारास लोकल सेवा तास-दीड तासासाठी बंद असली तरी रेल्वेची इतर यंत्रणा सतत कार्यरत असते. लांबपल्ल्याच्या गाड्यांना रात्री शहराबाहेर काढले जात असते. रेल्वेला रात्री उशिरा मेंटेनन्ससाठी मिळणाऱ्या वेळेचा पुरेपूर वापर करण्याचा रेल्वेचा प्रयत्न असतो. मध्य रेल्वेच्या ताफ्यात देशातील पहिली अत्याधुनिक एचओबीसीएम अर्थात हाय आऊटपुट बलास्ट क्लिनिंग मशीन दाखल झाली आहे. वडाळा यार्डमध्ये नुकतेच रेल्वे बोर्डाचे सदस्य (अभियंता) विश्वेश चौबे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, रेल्वे सुरक्षा आयुक्त ए. के. जैन, एस. के. अग्रवाल, एस. के. तिवारी यांनी नुकतीच या यंत्रणेची पाहणी करून तिला हिरवा झेंडा दाखविला.
रेल्वेकडे सध्या 919 मशीन्सचा ताफा असून त्यात या नव्या एचओबीसीएम मशीनचा समावेश करण्यात आला असून या मशीनची किंमत 65 कोटी रुपये इतकी आहे.
ही प्रोटोटाइप मशीन असून अशा प्रकारची ‘मेक इन इंडिया’अंतर्गत दुसरी मशीन देशातच तयार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अशा 490 मशीन्सची ऑर्डर देण्यात आली. त्यापैकी बऱ्याचशा देशातच तयार होणार आहेत.
या मशीनद्वारे ट्रॅकला न हटविताच त्याच्या खालील खडीला उकरून साफ केले जाते हे या मशीनचे मोठे वैशिष्टय़ आहे. या मशीनची निर्मिती ऑस्ट्रियाच्या प्लासर ऍण्ड थिओरर कंपनीने केली आहे.





























































