
मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्याविरोधात प्रवाशांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर रेल्वे प्रशासन ‘ऑक्टिव्ह मोड’वर आले आहे. सकाळी ‘पीक अवर्स’ला उत्तर हिंदुस्थानातून येणाऱ्या एक्सप्रेस गाडय़ांचा उपनगरी रेल्वे मार्गावरील प्रवेश रोखला जात आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना मुंबईच्या वेशीवर टिटवाळा, आसनगाव आदी भागांत थांबवले जात आहे. लोकलचे वेळापत्रक सुधारण्यासाठी हा नवा उपाय राबवला जात आहे.
मध्य रेल्वेवर सकाळी कर्जत, टिटवाळा, बदलापूरवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱया लोकल ट्रेन उशिराने धावतात. एसी लोकल सुरू झाल्यापासून अप लोकल गाडय़ांना तब्बल 30 ते 35 मिनिटांचा विलंब होत आहे. गाडय़ांचा वक्तशीरपणा बिघडण्यामागे उत्तर हिंदुस्थानातून येणाऱ्या मेल-एक्सप्रेस प्रमुख कारण ठरत आहेत. उत्तर हिंदुस्थानातील धुक्यामुळे तिकडून येणाऱया गाडय़ांना उशीर होत आहे. त्या गाड्या सकाळी 5 वाजण्यापूर्वी उपनगरी रेल्वेच्या भागात येणे अपेक्षित असते. मात्र अनेक दिवसांपासून उत्तरेकडील मेल-एक्सप्रेस चार ते पाच तास उशिराने धावून लोकल सेवेच्या ‘पीक अवर्स’ला कसारा, टिटवाळा, आसनगाव भागात पोहोचत आहेत. याच अनुषंगाने उपनगरी मार्गावरील सकाळचा ‘पीक अवर्स’ संपेपर्यंत उत्तर हिंदुस्थानातून येणाऱया मेल-एक्सप्रेस गाडय़ांना टिटवाळा, आसनगाव भागात थांबवून ठेवले जात आहे.
- लोकल ट्रेनच्या विलंबाचा नोकरदारांच्या रोजगारावर परिणाम होऊ लागला आहे. एका लोकलची चुकलेली वेळ सर्वच गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरित परिणाम करीत आहे. याला कारणीभूत लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा अडसर दूर करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. यापुढे मेल-एक्सप्रेससाठी लोकल सेवेच्या वेळापत्रकात तडजोड केली जाणार नाही. लोकल ट्रेनला प्राधान्याने पुढे जाऊ दिले जाईल.



























































