
सामना प्रतिनिधी । मुंबई
मध्य रेल्वेच्य प्रवाशांना आज पुन्हा एकदा आठवड्याची सुरुवात लेट मार्कनं करावी लागली आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे कसारा ते वासिंद सेवा ठप्प झाल्याने नोकरदार वर्ग तसेच प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. खडवली आणि वासिंदच्या दरम्यान काही तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, हा बिघाड दुरुस्त करण्यात आला असला तरी गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.
पहाटेच्या वेळात खडवली आणि वासिंद स्थानकांच्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे उप दिशेला म्हणजेच सीएसटीएमला जाणारी 7:43 ची लोकल ट्रेन अनिश्चित काळ वासिंदवर थांबवण्यात आली होती. तर 8:39 ची सीएसएमटी जलद लोकल रद्द करण्यात आली.
लांब पल्ल्याच्या गाड्याही खोळंबल्या
लांब पल्ल्यांच्या गाड्यांना देखील याचा फटका बसला असून राज्यराणी एक्सप्रेस खर्डी स्थानकात खोळंबली होती.
दरम्यान, कर्जत-वांगणी भागात दाट धुक्यामुळे या भागातील गाड्या देखील 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या.




























































