‘मरे’चे वेळापत्रक बिघडले! कुर्ला, घाटकोपर, मुलुंड स्थानकात प्रवाशांचा उडतोय गोंधळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोज मरे त्याला कोण रडे अशीच काहीशी मध्य रेल्वेच्या कारभाराची परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेचे प्रमुख स्थानक असलेल्या कुर्ला स्थानकातील वेळापत्रक पुरते बिघडले असून फलाटावरील इंडिकेटर दाखवतात एक गाडी आणि प्रत्यक्षात येते भलतीच गाडी. अनेकदा जलद मार्गावरील लोकल 20 मिनिटांनी अपेक्षित असल्याचे इंडिकेटरवर दिसते, मात्र गाडी पुढील एक-दोन मिनिटात फलाटावर दाखल होते. तर कधी याउलट परिस्थिती असते. कुर्ला, घाटकोपर, मुलुंड स्थानकात वारंवार घडणाऱया अशा घटनांमुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ उडत असून या फलाटावरून त्या फलाटावर धावाधाव करावी लागत आहे. त्यामुळे प्रवासी पादचारी पुलावर उभा राहून आधी कोणती गाडी येणार याची वाट पाहताना दिसतात.

कुर्ला स्थानकातून दररोज पाच-सहा लाख प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे मेन लाइनच्या धीम्या, जलद आणि हार्बर या तिन्ही मार्गाच्या गाडय़ांसाठी फलाटावर मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे लोकलमध्ये आपल्याला चढता येईल की नाही या विवंचनेत प्रवासी असतात. त्यातच धीम्या आणि जलद मार्गावरील इंडिकेटरच्या लहरीपणामुळे लोकलचे नाव, ती किती वेळात येणार याची अचूक माहिती दिली जात नाही. जलद मार्गावर तर अनेकदा वीस मिनिटांनी लोकल फलाट क्रमांकावर येईल असे इंडिकेटर दाखवतात. त्याबाबत उद्घोषणा होते. त्यामुळे प्रवासी धीम्या गाडीसाठी फलाट क्रमांक 4 वर जातात. तोच जलद मार्गावरील गाडी फलाटावर दाखल होते. त्यामुळे प्रवाशांची दररोज धावाधाव होत आहे. याबाबत रेल्वेकडे विचारणा केली असता तांत्रिक बिघाडामुळे चुकीची वेळ दाखवली जात असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे. हीच परिस्थिती घाटकोपर, मुलुंड, ठाणे स्थानकात आहे.

रेल्वेला लोकल प्रवाशांची किंमत नाही

मध्य रेल्वेला सध्या उपनगरीय लोकल प्रवाशांची किंमत नाही, त्यांनी लांब पल्ल्याच्या गाडय़ांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच लोकल सेवेचे वेळापत्रक पुरते बिघडले असून त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे, ही चिंतेची बाब आहे. लोकल गाडय़ा वेळेवर चालवा म्हणून अनेकदा निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे उपनगरीय प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.