
मध्य रेल्वे प्रशासनाने आठ एक्सप्रेसचे जुने डबे बदलून त्या ट्रेनना कायमस्वरूपी अद्ययावत एलएचबी कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱया चेन्नई एक्सप्रेसचा समावेश आहे. संबंधित आठ गाडय़ांना 14 जानेवारीनंतर नवीन कोच जोडणार असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.
प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वे प्रशासनाने 8 एक्सप्रेसचे जुने डबे नव्या एलएचबी कोचमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये सीएसएमटी ते चेन्नई एक्सप्रेस, पुणे-वेरावळ एक्सप्रेस, पुणे-भगत कोठी एक्सप्रेस, पुणे-भुज एक्स्प्रेस, पुणे-अहमदाबाद एक्सप्रेस, कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेस, कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस, कोल्हापूर-अहमदाबाद एक्सप्रेस या गाडय़ांचा समावेश आहे. यापैकी सीएसएमटी-चेन्नई एक्सप्रेसला 16 एलएचबी डबे, पुणे-अहमदाबाद एक्सप्रेसला 20 डबे आणि कोल्हापूर-अहमदाबाद एक्सप्रेसला 18 नवीन डबे कायमस्वरूपी जोडण्यात येणार आहेत.
‘तुतारी’सह 17 ट्रेनच्या मागणीकडे दुर्लक्ष
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱया दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसबरोबरच महाराष्ट्रातील एकूण 17 एक्सप्रेसना अद्याप जुनेच डबे आहेत. त्या गाडय़ांना दररोज गर्दी होत असल्याने प्रवाशांना गुदमरण्याचा त्रास होतो. त्यांचे जुने डबे बदलून एलएचबी कोच लावण्याची मागणी पेंद्र सरकारकडे वेळोवेळी केली गेली आहे. मात्र त्या मागणीचे पत्र पेंद्र सरकारकडे धूळ खातच पडल्याचे प्रवासी हक्क कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी सांगितले.






























































