‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ला खवैय्यांचा भरपेट प्रतिसाद; सीएसएमटीनंतर आता एलटीटीत लवकरच चाकावरचे हॉटेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ला खवैय्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रेल्वेच्या बोगीमध्ये तयार केलेले हे रेस्टॉरंट लॉकडाऊन दरम्यान सुरू करण्यात आले होते. अशा प्रकारची रेल्वेची थीम आधारित रेस्टॉरंट येत्या काही दिवसांत कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस, नेरळ, लोणावळा आणि इगतपुरी स्थानकांवर आणि पुणे विभागातील आकुर्डी, बारामती, चिंचवड आणि मिरज स्थानकांवरही सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे.

कोरोना साथीच्या लाटेनंतर सर्व व्यवहार सर्वसामान्य होत असताना मध्य रेल्वेने रेल्वे प्रेमींसाठी थीम आधारित जुन्या बोगीचा वापर करीत चाकावरच्या हॉटेलची संकल्पना प्रत्यक्षात आणली. या हॉटेलमध्ये प्रवाशांना जेवणाचा अनोखा अनुभव मिळत आहे. येथे पी.डीमेल्लो मार्गावरील मागील प्रवेशद्वारावर टॅक्सी आणि कार पार्कींगसाठी भरपूर मोठी जागा असल्याने येथील निसर्गरम्य वातावरणात प्रवाशांची संध्याकाळ त्यांच्या कुटुंबियांसोबत चांगलीच रंगतदार होत आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 18 ऑक्टोबर 2021 रोजी मध्य रेल्वेचे पहिले ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 18 च्या समोरील, हेरिटेज गल्ली येथे, रूळांवर बसवण्यात आलेले सुधारित कोचमध्ये हे रेस्टॉरंट आहे. हेरिटेज गल्लीमध्ये नॅरो गेज लोकोमोटिव्ह, जुन्या प्रिंटिंग प्रेसचे काही भाग इत्यादींसह रेल्वे कलाकृती आहेत. बोगी-वोगी असे नाव दिलेले हे एक उत्तम जेवणाचे ठिकाण आहे.

या कोचमध्ये 10 टेबल असून 40 जण एकत्र जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. रेस्टॉरंटच्या आतील भाग अशा प्रकारे सजवला आहे की रेल्वे-थीम असलेल्या सेटिंगमध्ये जेवणाचा अनुभव मिळतो. हे रेस्टॉरंट सुरू झाल्यापासून आजपर्यंत अंदाजे 60 हजार जणांनी येथील पदार्थांचा आस्वाद घेतला आहे. आता हे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ परिसरातील खाण्याचे आवडते ठिकाण बनले आहे.

कॅटरिंग पॉलिसीच्या नाविन्यपूर्ण कल्पनेअंतर्गत रेल्वे-थीम असलेल्या सेटिंगमध्ये जेवणाचा अनोखा अनुभव येथे मिळतो. रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू करणारी मध्य रेल्वे एकमेव रेल्वे आहे. 3 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू करण्यात आलेल्या नागपूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर रूळांवर बसवलेला असाच रेस्टॉरंटचा डबा होता. रेस्टॉरंटच्या डब्यात रेल्वे कोचचे रुप साकारण्यात आले आहे. डबा सुशोभित करताना नागपूर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांचा विचार करण्यात आला आहे. तसेच कोचचा मूळ रंग आणि डिझाइन कायम ठेवण्यात आले आहे. या रेस्टॉरंटमध्ये 10 टेबल असून 40 जणांची क्षमता आहे. आतापर्यंत अंदाजे 30 हजार प्रवाशांनी येथील पदार्थांचा आस्वाद घेतला आहे.

या रेस्टॉरंटमध्ये उत्तर, दक्षिण, प्रादेशिक आणि इतर पाककृती मिळतात. येथील दर व मेनू परवानाधारकाद्वारे ठरवले जातात आणि रेल्वेने मंजूर केलेले बाजार दरानुसार असतात. मुंबई विभागातील लोकमान्य टिळक टर्मिनस, नेरळ, लोणावळा आणि इगतपुरी स्थानकांवर आणि पुणे विभागातील आकुर्डी, बारामती, चिंचवड आणि मिरज स्थानकांवर अशाच प्रकारची रेस्टॉरंट्स सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे.