
सामना प्रतिनिधी । नगर
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या पिंपळगाव रोठा ता. पारनेर येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान येथे गुरुवारी १३ डिसेंबरला चंपाषष्ठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सुमारे ६० हजारावर भाविकांची दर्शनास गर्दी होईल, असा अंदाज असून देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ यांनी जोरदार तयारी केली आहे. या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांसह किर्तन, प्रवचन आदी सोहळे साजरे होणार आहेत.
पूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिराचा सुवर्ण कलशारोहन १९९७ साली चंपाषष्टीला करण्यात आले तेव्हापासून हा उत्सव मोठ्या प्रमाणात होत आहे हे २१ वे वर्ष आहे , श्री खंडोबा व म्हाळसा यांच्या मुर्ती मंदिराचा तिसरा वर्धापन दिन व प.पू.गगनगिरी महाराजांच्या मूर्ती ध्यानमंदिराचा दुसरा वर्धापन दिनही या महोत्सवात साजरा होणार आहे. पहाटे श्री खंडोबास मंगलस्नान, उत्सव मूर्तीची साज शृंगारासह सिंहासनावर अनावरण पुजा व आरती झाल्यानंतर स.६ वा. अभिषेक पुजा व आरती स.७ ते ९ होमहवन स.८ ते १० काळ भैरवनाथ भजनी मंडळाचे भजन, गोरेगाव ग्रामस्थांचा दिंडी सोहळा, ११ वा. महाप्रसाद, सकाळी १० वा. प्रकाश महाराज बोधले यांचे किर्तन होणार आहे.
दु १ वा. श्री खंडोबा चांदीच्या उत्सव मुर्तीची पालखीतून मंदिर प्रदक्षिणा, शोभा मिरवणूक तसेच दुपारी १२ ते १ पर्यंत गोरक्षनाथ मठ त्र्यबंकेश्वर व भीमाशंकरचे मठाधीपती गणेशनाथ महाराज यांचे दर्शन प्रवचन व सत्संग सोहळा होणार आहे. तर देणगीदारांचा नानजीभाई ठक्कर यांच्या हस्ते सन्मान होऊन पालखीचे मंदिर प्रदक्षिणा करून व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती होणार आहे दुपारी दोन नंतर खंडोबा गाणी स्पर्धा असे कार्यक्रम साजरे होणार आहेत.
आज पूर्ण दिवस खंडोबा फाटा ते मंदिर हा रस्ता दोन्ही बाजूंनी बंद राहील, वाहनतळ, पिण्याचे पाणी, दर्शन व्यवस्था आदींचे देवस्थान ट्रस्टने नियोजन केले आहे. चंपाषष्ठी महोत्सवानिमित्त भाविकांनी देवदर्शनाबरोबर विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष अॅड पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सरचिटणीस महेंद्र नरड, खजिनदार हनुमंत सुपेकर, चिटणीस मनिषा जगदाळे यांच्यासह सर्व आजी माजी विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ व मुंबईकर मंडळाने केले आहे.





























































