
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाची शनिवारी (18 जानेवारी 2025) मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बीसीसीआय निवड समीतीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी घोषणा केली. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात हिंदुस्थानचा संघ मैदानात उतरणार आहे. तसेच उपकर्णधार पदाची माळ शुभमन गिलच्या खांद्यावर सोपवण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. परंतु युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल आणि अर्शदिप सिंग यांना संघामध्ये स्थान देण्यात आल्याने क्रीडा प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
रोहित शर्माने पत्रकार परिषदेमध्ये यशस्वी जयस्वाल आणि अर्शदिप सिंगच्या निवडीसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना चोख उत्तर दिले. “यशस्वीने मागील 6 ते 8 महिन्यांमध्ये केलेल्या प्रदर्शनामुळे त्याची निवड करण्यात आली आहे. भलेही त्याने आतापर्यंत एकही वनडे सामना खेळला नसेल, परंतु आम्हाला माहित आहे तो काय करू शकतो.” असे म्हणत त्याने यशस्वी जयस्वालच्या निवडीचे समर्थन केले आहे. यशस्वीने आतापर्यंत आपल्या फलंदाजीची जादू कसोटी आणि टी-20 क्रिकेटमध्ये दाखवली आहे. दोन्ही फॉरमॅटमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. विशेष बाब म्हणजे 2024 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा यशस्वी दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.
यशस्वी जयस्वाल सोबत वेगवान गोलंदाज अर्शदिप सिंगचीही निवड संघामध्ये करण्यात आली आहे. “भलेही अर्शदिपने वनडे फॉरमॅटमध्ये जास्त सामने खेळले नाहीत. परंतु तो टी-20 मध्ये बऱ्याच काळापासून संघाचा महत्त्वाचा भाग आहे. या दरम्याने त्याने आपली उपयुक्तता सिद्द केली आहे.” असे रोहित शर्मा म्हणाला आहे. अर्शदिप सिंगने आतापर्यंत टीम इंडियाकडून 60 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. तसेच त्याने 8 वनडे सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामुळे दोघांकडून संघाला आणि चाहत्यांना अपेक्षा असणार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. तर टीम इंडियाचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 23 फेब्रुवारीला पाकिस्तान आणि तिसरा सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हिंदुस्थानचा संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा.
राखीव खेळाडू – हर्षित राणा



























































