
भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केलेली नाही अशी सारवासारव भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. भाजप हा पक्ष कुणाला घाबरत नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही, जे बोलायचं ते छातीठोकपणे बोलतो. समोरच्याला टाकून बोलणं, लागून बोलणं अशी आमची संस्कृती नाही, अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली
पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले गिरीश प्रभुणे यांची भेट घेण्यासाठी चंद्रकात पाटील हे चिंचवड येथील गुरुकुलम येथे आले होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी अमित शहा यांनी सिंधुदुर्ग दौऱयावर असताना शिवसेना संपण्याची भाषा केली नाही, पण मागच्या 15 महिन्यात ज्या पद्धतीने सरकारचा कारभार चालला आहे, तो आमच्या सरकार वेळी राहिला असता, तर शिवसेना संपली असती, असं वक्तव्य केल्याचं सांगितलं.
वैभववाडी येथे 17 पैकी 17 नगरसेवक हे भाजपाचे आहेत. त्या पैकी सहा शिवसेनेत गेले. जाणं येणं या त्या कारणाने होत असतं. शाह यांच्या वक्तव्याशी याचा कसलाही संबंध नाही, त्यांच्या पायगुणाने सरकार येणार असेल ते येईलच. पण सरकार सरकार आहे. जुने हिशोब काढून बसण्याचं कारण नाही, असे ते म्हणाले.





























































