
कोरोना लसीकरणाच्या जनजागृतीसाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. अशातच चंद्रपुरात एका दाबेली विक्रेत्या महिलेने अनोखी शक्कल लढवून लसीला प्रोत्साहन दिले आहे. ज्याने कोरोना लसीचे दोन डोज घेतले, त्यांना दाबेलीच्या किमतीत 15 टक्क्यांची सूट दिली. एवढेच नाहीतर रक्तदात्यांना मोफत दाबेली देण्याचा उपक्रम लक्ष्मी दाबेली सेंटरने सुरू केलाय.
हे दाबेली उपहार गृह शहा दाम्पत्य चालवते. चंद्रपूरच्या श्रीकृष्ण टॉकीजलगत त्यांचे छोटेसे दुकान आहे. आर्थिक स्थिती जेमतेम असली, तरी समाजात जनजागृतीसाठी आपणही खारीचा वाटा उचलून सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावला पाहिजे, या विचाराने त्यांनी हा अनोखा प्रयोग सुरू केल्याचे लक्ष्मी शहा सांगतात. प्रलोभनातून प्रोत्साहन असे या उपक्रमाचे स्वरूप आहे आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. दाबेली हे खाद्य मोठ्या आवडीने खाल्ले जाते. त्यात जर टेस्ट हटके असेल तर खवय्ये अशा ठिकाणी हमखास जातात. लक्ष्मी दाबेली अशाच हटके टेस्टसाठी प्रसिद्ध आहे. आतातर इथे 15 टक्क्यांची सूट देण्यात आली, त्यामुळे ग्राहकांची पावले आपसूकच तिकडे वळू लागली आहेत. लसीकरणासाठी एखाद्या छोट्या व्यावसायिकाने घेतलेला हा पुढाकार आता कौतुकाचा विषय ठरला आहे.






























































