
पत्नीला जादुटोणा करून संपवल्याच्या संशयातून पुतण्याने काकाची हत्या केल्याची धक्कादायाक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. ही घटना गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या चेक दरूर येथे घडली. किसन बाघू वराते (75) असे मृतकाचे नाव आहे. हत्या करणारा मोरेश्वर गिरमा भोयर याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
संशयाचं भूत डोक्यात शिरलं की, माणूस क्रूरतेची सिमा गाठतो, याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्ह्यात आला. पत्नीला जादुटोणा करून संपविल्याच्या संशयातून जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या चेक दरूरात ही घटना आज घडली. गावातील मोरेश्वर गिरमा भोयर यांच्या पत्नीचा कर्करोगाच्या आजाराने मृत्यू झाला, मात्र माझ्या पत्नीला जादुटोणा करून संपविलं, असा संशय मोरेश्वरला आला. पुतण्याला काका किसन वराते यांच्यावर संशय आला. यातून अनेकदा दोघांचे भांडण होत असे.
संशय आणि भांडणातून आज पुतण्याकडून ही क्रूर घटना घडली. मोरेश्वरने आज 10 वाजण्याच्या सुमारास काका किसन वराते याच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात किसन वराते याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलीस स्थानकाचे ठाणेदार जीवन राजगुरु यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आरोपी मोरेश्वरला ताब्यात घेतले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करत आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनेक संस्था कार्य करीत आहेत. प्रशासनही जनजागृती मेळाव्यातून अधूनमधून मार्गदर्शन करीत असते. कायद्याची निर्मितीही झालीय, मात्र अंधश्रद्धेची मुळे किती खोलवर रुजलेली आहेत, याचा प्रत्यय दरूर येथे घडलेल्या घटनेने आल्याचे बोलले जात आहे.



























































