
मतदारयादीतील घोटाळा चंद्रपूर जिल्ह्यातही समोर आला आहे. घुग्गुस या गावात एकाच घरात 119 मतदारांची नोंद सापडली आहे. मुळात या घरी केवळ दोन मतदार आहेत. घुग्गुस हे ग्रामपंचायत असलेले औद्योगिक गाव आहे. याच गावात सचिन बांदुरकर यांचे 350 क्रमांकाचे घर आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत या घरातून तब्बल 119 जणांची नोंदणी झाली आहे. या मतदारांचा घर क्रमांक हा 350 आहे. एका लहानशा घरात एवढ्या मतदारांची नोंद कशी काय करण्यात आली, हा मोठा प्रश्न आहे. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोगाच्या यादीनुसार तपासणी केली असता हा घोटाळा समोर आला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हे कोण लोक आहेत, त्यांची नोंदणी कुणी केली, ज्यांनी कुणी केली असेल, त्यांच्या लक्षात हा प्रकार आला नाही का, की हे बोगस मतदार आहेत, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. ही माहिती समोर आल्यावर घरमालकही चकित झाले. तर काँग्रेसने या बोगस प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली.