
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संध्याकाळी फिरायला निघालेल्या आई-मुलीवर बिबट्याने हल्ला केला. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या गजबजलेल्या पर्यावरण चौकाती ही घटना घडली.
आईच्या देखत 5 वर्षाच्या चिमुरडीला बिबट्याने उचलून आसपासच्या झुडपी जंगलात धूम ठोकली. आरडाओरडा करून गर्दी एकत्र झाल्यावर झुडपी जंगलात तिचा शोध घेतला. या दरम्यान नागरिकांना जखमी अवस्थेतील अर्धमेली चिमुकली आढळली. मुलीला तातडीने सामान्य रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरानी तिला मृत घोषित केले. भरदिवसा बिबट्याच्या हल्ल्यात सीआयएसएफच्या जवानाच्या मुलीच्या मृत्यूने प्रशासन हादरले आहे. लावण्या उमाशंकर दांडेकर-5 असे चिमुरडीचे नाव आहे. वनविभागाने या परिसरात सध्या बंदोबस्त लावला आहे. वीज केंद्राची सुरक्षा सांभाळणाऱ्या सीआयएसएफ जवानांना याच पर्यावरण चौक भागात निवासी गाळे दिले गेले आहेत. महाऔष्णिक वीज केंद्र परिसरातील विस्तीर्ण परिसरात शेकडो वन्यजीव वास्तव्याला आहेत. मात्र अशा पद्धतीने हल्ला होण्याची नजीकच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेने महाऔष्णिक वीज केंद्र प्रशासन, वनविभाग आणि जिल्हा प्रशासन हादरले आहे.
































































