खासगी गाडीत 3 ईव्हीएम सापडल्याचा आरोप, चंद्रपुरात विरोधकांचा गोंधळ

602
evm-vvpat

चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर मतदारसंघातील दुर्गापूर इथं एका खासगी वाहनात तीन ईव्हीएम सापडल्याचा दावा करण्यात आला. या वृत्तामुळे इथल्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मतदानानंतर हा प्रकार लोकांच्या लक्षात आला. ही मशिन सापडल्याचा दावा करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षाच्या उमेदवाराने आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करीत गोंधळ घातला. या गोंधळामुळे इथली परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी इथे मोठा बंदोबस्त लावण्यात आला. सोमवारी रा  त्री सुमारे तीन तास हा गोंधळ सुरूच होता.

कडक बंदोबस्तानंतर परिस्थिती निवळत नसल्याने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी लोकांना खरी परिस्थिती समजावून सांगितली. ही ईव्हीएम राखीव मशिन असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. एखादे ईव्हीएम मशिन बिघडल्यास ते बदलण्यात येते, त्यासाठी या राखीव मशिनचा वापर करण्यात येत असतो. या अधिकाऱ्यांनी कोणतीही चुकीची गोष्ट घडली नसल्याचे तिथे जमलेल्या लोकांना सांगितले. पोलिसांनी ही ईव्हीएम ताब्यात घेतली खरी मात्र तरीही काँग्रेस कार्यकर्त्यांचे समाधान झाले नव्हते. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे उमेदवार विश्वास झाडे यांनी केली आहे.

मतदान झालेल्या आठ मशिन्स आधीच स्ट्रॉंग रुममध्ये पोचल्या होत्या अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. उर्वरित राखीव ईव्हीएम या या वाहनातून आणल्या जात होत्या. उमेदवारांना काही शंका असल्यास ते बल्लारपूर इथं ठेवलेल्या मतदान यंत्राची तपासणी करू शकतात, असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. मतदान झालेल्या मशिन्स आधीच सुरक्षित नेल्या असताना रिजर्व मशिन्स मागे कशा ठेवल्या, लोकांनी पकडल्यानंतर कर्मचारी पळून का गेले, खासगी वाहन का वापरण्यात आलं, असे प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांनी विचारले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या