
तीन दिवसात वीस जनावरे ठार करणाऱ्या वाघाने आज दोन जणांना जखमी केले. शरद बोपनवार, सुरेश मत्ते अशी त्या दोघांची नावे आहेत. या घटनेनंतर गावकरी वनकर्मचाऱ्यांवर चांगलेच संतापले. गावकऱ्यांचा रोष बघता वनविभागाने वाघाचा शोध घेण्यासाठी फौजफाटा बोलाविला. नागपूर इथून शूटरला बोलाविण्यात आले आहे. गावाजवळ असलेल्या नाल्यात वाघ दबा धरून असल्याचं वनविभागाने सांगितलं.
सध्यातरी वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेलं नाही. मात्र वनविभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून वेजगाव, आर्वी, तोहोगाव, सरांडी या परिसरात वाघाने धुमाकूळ घातला. अनेक जनावरांचा बळी घेतला. वाघाला जेरबंद करण्यासाठी दोन दिवसापुर्वीच वनक्षेत्रात तीन पिंजरे उभे केलेत. मात्र वाघ काही अडकला नाही. साधाणता पंधरा वर्षापुर्वी वेजगावात बिबट्याने धुमाकुळ घातला होता. तीघांचा बिबट्याने बळी घेतला. त्या घटनेची आठवण पुन्हा ताजी झाली आहे.




























































