चंद्रपूर – हिंस्र प्राण्यांचा रोख मानवी वस्तीकडे वळल्याने मानव-प्राणी संघर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभिषेक भटपल्लीवार

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि मानवातील संघर्ष हा आता नवा राहिलेला नाही. मागील दशकापासून सुरू असलेला हा संघर्ष आता टिपेला पोचलाय. यात कधी माणूस तर कधी वन्यजीव मारला जात आहे. दोन्ही जीवांसाठी धोकादायक असलेला हा संघर्ष येत्या दिवसांत आणखी भयावह होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यात प्राधान्य कुणाच्या जीवाला द्यायचे, असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

अडीचशेवर पट्टेदार वाघ, तीनशे बिबटे, शेकडो अस्वलं आणि घनदाट अरण्य हे जिल्ह्याचे वैभव आहे. मात्र दुसरीकडे याच वैभवाने लोकांचे जीवन धोक्यात आणले आहे. आधी ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षित जंगलात वास्तव्य करणारे हे हिंस्र प्राणी आता संख्येने वाढल्याने अंतर्गत संघर्ष टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणांच्या शोधात जंगलाबाहेर पडू लागले आहेत. जी गावे जंगलालगत आहेत, अशा गावांत ते आपला निवास करू लागले आहेत. गावाशेजारी तलाव, लपण्यासाठी जंगल किंवा झुडपे आणि खाण्यासाठी गुरे-कुत्री सहजपणे उपलब्ध होत असल्याने हे प्राणी तिथे तळ ठोकू लागले आहेत. सुमारे शंभरावर अशी गावे या जिल्ह्यात आहेत. त्यामुळे गावकरी बाहेर पडले की, संघर्ष अटळ असतो. बिबटे तर गावात मुक्कामाला येऊ लागल्याचेही बघायला मिळत आहे.

घराच्या छतावर बसून कुत्र्यांच्या शिकारीसाठी हे बिबटे रात्रीच्या सुमारास घरावर चढून बसू लागले आहेत. इतकी गंभीर स्थिती आता निर्माण झाली. अनेकदा घरात घुसून बालकांना, मोठ्यांना बिबट्याने उचलून नेल्याच्या घटना ताज्या आहेत. त्यामुळे लोकांनी जगायचे कसे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील ही स्थिती कायम असतानाच आता शहरातही वन्यप्राण्यांनी हजेरी लावली. जंगल सोडून हे सगळे प्राणी वीज केंद्राच्या परिसरात राजरोसपणे फिरताना दिसू लागलेत. दिवसात तीन पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या येथील कर्मचारी आणि कामगारांना यामुळे जीवाचा मोठा धोका निर्माण झालाय. वीज केंद्रात रात्रपाळीत कामावर जाणाऱ्या कामगारावर वाघाने हल्ला करून शीर धडावेगळे केले. तर बाजूच्याच दुर्गापूरलगत असलेल्या वेकोली कोळसा खाण परिसरात एका 16 वर्षीय मुलाला बिबट्याने ठार केले. यामुळे स्थानिकांत आणि कामगारवर्गात मोठा असंतोष उफाळला आहे. सीसीएफ कार्यालयावर या कामगारांनी धडक दिली. एवढेच नाही तर सर्वपक्षीय नेत्यांनी वीज केंद्राच्या द्वारावर उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण अजूनही सुरू आहे. जोपर्यंत वीज केंद्र आणि दुर्गापूर परिसरातील वाघांचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

वीज केंद्रासोबतच आता चंद्रपूर शहराच्या सीमेवरही वाघाने उपस्थिती दर्शवली असून, वस्तीत प्रवेश करू लागला. हवेली गार्डन आणि वडगाव परिसरात वाघ आणि अस्वली भररस्त्यात दिसू लागल्या आहेत. चंद्रपूर शहराच्या सीमेवरून इरई नदी वाहते. शहराला वेढा घालणाऱ्या या नदीत काटेरी झुडपांचे साम्राज्य आहे. अनेक ठिकाणी पात्र दिसेनासे झाले आहे. याचाच फायदा हे प्राणी घेत आहेत. त्यांच्यासाठी ही नदी म्हणजे सुरक्षित अधिवास ठरले आहे. पिण्यासाठी पाणी, लपण्यासाठी झुडपे आणि खाण्यासाठी मुबलक गुरे, यामुळे प्राण्यांनी येथे बस्तान मांडले. नदीलगत जो नागरी परिसर आहे, तिथे आता भीती पसरली आहे. नागरिक रात्रीच्या वेळी घरात कोंडून घेत आहेत. या भीतीच्या सावटात किती दिवस जगायचे, असा प्रश्न इथले नागरिक करीत आहेत.

ही धोक्याची घंटा मागील पाच वर्षांपासून वाजत आहे. पण त्यावर प्रभावी उपाय अजूनही करण्यात आलेले नाहीत. आता लागोपाठ दोन घटना घडल्याने पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे वन विभाग कामाला लागला आहे. कॅमेरे आणि पिंजरे लावण्याचे प्राथमिक उपाय सुरू करण्यात आले. त्याला प्रारंभीच यश मिळाले. वीज केंद्रातील एक वाघ पकडला गेला. पण अजूनही तीन वाघ मोकाट आहेत. शिवाय इरई नदीच्या पात्रातील झुडपे काढण्याचे कठीण काम शिल्लक आहे. हे सगळे उपाय जोपर्यंत केले जाणार नाही, प्राण्यांना लपण्याची ठिकाणे स्वच्छ केली नाही, तर ही समस्या सुटणे अवघड आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात जो वन्यजीव-मानव संघर्ष सुरू आहे, त्याची दोन स्वतंत्र रूपे आहेत. एक जंगलातील नैसर्गिक सहजीवन आणि दुसरे कृत्रिम सहजीवन. संपूर्ण जिल्हाच जंगलाने व्यापलाय. संरक्षित जंगल आणि ताडोबाच्या बफर क्षेत्रात शंभरावर गावे वसली आहेत. या गावातील लोकांनी आता वन्यजीवांच्या सोबतीने कसे जगायचे, याचे तंत्र अवगत केले आहे. ज्या अनुचित घटना घडतात, त्या या तंत्राचे पालन न केल्याने घडतात. पण शहरी भागात ज्या घटना घडत आहेत, त्याला कोण दोषी, या प्रश्नाचे उत्तर अजून सापडलेले नाही. या सगळ्या परिस्थितीचे विश्लेषण दोन पातळीवर केले जाते. त्यातला एक पक्ष हा वन्यजीवांच्या तर दुसरा पक्ष मानवी जीवांच्या बाजूने आहे. माणूस मोठा की वाघ, हा प्रश्न नेहमीच वादाचा राहिला. पण बऱ्याचदा होते असे की, वारंवार वाघाचे हल्ले झाल्यावर त्याला ठार मारण्याचे आदेश दिले जातात. नरभक्षक वाघाला मारून सारेच सुटकेचा निःश्वास टाकतात. जणू हाच अंतिम पर्याय आहे की काय असे वाटायला लागते. पण वेगळ्या मार्गाचा-उपायांचा फार विचारच केला जात नाही. लोकांचा संताप वाढला की राजकीय दबाव आणून त्याचा इश्यू केला जातो आणि यात वाघ जीवानिशी जातो. अशा अनेक घटना या जिल्ह्यात घडल्या आहेत. मुळात मनुष्य आणि वन्यजीव दोघेही जगले पाहिजेत, दोघांचेही जीव तेवढेच महत्वाचे आहेत; हे समजून घेत उपाययोजना व्हायला हव्या. यासाठी जिल्ह्यात काही वन्यजीवप्रेमी संघटना धडपड करीत आहेत.