सरकारी नोकरी मिळविण्यासाठी पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या

murder

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात “पती पत्नी और वो”चा भयंकर प्रकार पुढे आला आहे. जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील वर्धा नदीकिनारी पोत्यात भरून असलेले एक शव आढळल्याने पोलिसांनी तपासाला प्रारंभ केला आणि अनैतिक संबंधातून झालेल्या हत्येचे प्रकरण पुढे आले. मृत ‘मारूती काकडे (वय 34 हा सरकारी कोळसा कंपनीत खाण कामगार होता. तो मद्यपी असल्याने पत्नी प्राजक्ताशी त्याचे कौटुंबिक वाद होत असत. प्राजक्ताचे स्वतःच्या बहिणीचा दिर ‘संजय टिकले’सोबत अनैतिक संबंध होते. या दोघांनी ‘मारूतीचा’ काटा कायमचा दूर करण्याचा कट रचला. आपल्याला यामुळे सरकारी नोकरी मिळेल व प्रियकरासह विवाह करून आयुष्य सुखी होईल, अशी प्राजक्ताची योजना होती.

बल्लारपूर शहरापासून दूर 50 किमी अंतरावर असलेल्या नकोडा येथे कट तडीस नेला. एक साथीदार विकास नागरले याचा वापर यात केला गेला. विकास ठरल्यानुसार मृताच्या घरी पोचला. भाड्याने घर मिळेल का, याबाबत विचारपूस करण्यासाठी त्याला बाहेर बोलावून त्याला दारू पाजण्याचे आमिष दाखविण्यात आले. घरून बाहेर निघाल्यावर नकोडा येथेच त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. तो जिवंत राहू नये, यासाठी नदीपात्रात बुडवण्यात आले व नंतर शव एका पोत्यात भरून पुन्हा बल्लारपूर शहरालगत असलेल्या वर्धा नदी किनारी फेकण्यात आले.

पोलिसांना शव तातडीने मिळावे व त्यानंतर नोकरीची प्रक्रिया सोपी व्हावी, हा त्यामागचा उद्देश होता. मात्र पोलिसांनी मृताचे मोबाईल कॉल डिटेल्स व आरोपींचे डिटेल्स यांची पडताळणी केल्यावर आरोपींना अटक केली गेली.  यात पत्नी प्राजक्ता, तिची आई कांता म्हशाक्षेत्री,  प्रियकर संजय टिकले व कटात सहभागी साथीदार विकास नागरले यांचा समावेश आहे, अशी माहिती बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनी दिली

आपली प्रतिक्रिया द्या