
‘तुम्ही राजीव गांधी यांचे पुत्र असल्याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला का?’ अशा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्या वक्तव्याची देशभरात निंदा होत आहे. राहुल गांधी यांना उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्याबद्दल तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधला आहे. ‘मोदीजी, हेच भाजपचे संस्कार आहेत का?’ असा संतप्त सवाल त्यांनी मोदींना केला आहे. तसेच शर्मा यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
चंद्रशेखर राव हे शर्मा यांच्या वक्तव्यावरून चांगलेच भडकले आहेत. हैदराबादमधील रायगिरीमध्ये एका जाहीर सभेत त्यांनी शर्मा यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर तोफ डागली. ‘मोदीजी, ही आपल्या देशाची मर्यादा आहे का? हा आपला हिंदू धर्म आहे का? ही आपल्या देशाची संस्कृती आहे का? एका नेत्याला तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री वडील कोण आहेत असा प्रश्न विचारतात? देशासाठी ही चांगली बाब नाही. माझी मान शरमेने झुकली आहे. माझ्या डोळ्यात पाणी येत आहे.’ असे चंद्रशेखर राव यावेळी म्हणाले. राहुल गांधी यांनी सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागितले होते. त्यावरून हेमंत बिस्व शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
हिंदू धर्माला विकून मते मागणाऱयांनो, तुम्ही खूप खराब आहात
चंद्रशेखर राव हे इतके संतापले आहेत की, त्यांनी वेद, भगवद्गीता, रामायण, महाभारतातून हीच शिकवण मिळाली आहे का, असा सवाल पंतप्रधान मोदी आणि भाजपला केला आहे. ‘हिंदू धर्माला विकून मते मागणाऱयांनो, तुम्ही खूप खराब लोक आहात.’ अशी टीकाही त्यांनी केली.




























































