‘चांद्रयान-2’ संपलेले नाही; भविष्यात सॉफ्ट लँडिंग करून दाखवणार!

1062

‘चांद्रयान-2’च्या विक्रम लँडरचे आम्ही सॉफ्ट लँडिंग करू शकलो नाही. तांत्रिक कारणांमुळे आम्हाला ते शक्य झाले नाही, पण ‘चांद्रयान-2’ अजून संपलेले नाही. भविष्यात सॉफ्ट लँडिंग करून दाखवणारच असा विश्वास ‘इस्रो’ प्रमुख के. सिवन यांनी व्यक्त केला. येत्या काही महिन्यांमध्ये अत्याधुनिक उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

आयआयटी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. विक्रम लँडरची सॉफ्ट लँडिंग होऊ शकले नाही, परंतु चंद्राच्या पृष्ठभागापासून 300 मीटरवर संपूर्ण यंत्रणा अजूनही कार्यरत असल्याचेही सिवन यांनी सांगितले. भविष्यात ‘इस्रो’ आपल्या अनुभवाचा वापर करून आणि तांत्रिक चूक पुन्हा घडणार नाही याची काळजी घेऊन विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगचा संपूर्ण प्रयत्न करेल असे सिवन यांनी सांगितले.

 डिसेंबरमध्ये उपग्रहाचे प्रक्षेपण
पुढच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये ‘एसएलएलव्ही’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येईल, असेही सिवन यांनी सांगितले. येत्या काही महिन्यांत अनेक अत्याधुनिक उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येईल, असेही ते म्हणाले. तसेच ‘चांद्रयान-2’ अजून संपलेले नसून आपले आदित्य एल 1 मिळन, ह्युमन स्पेसफ्लाइट प्रोग्रॅम ट्रकवर आहे. ही यंत्रणा चांगले काम करत असल्याचे ते म्हणाले. लवकरच 200 टन सेमी-क्रायो इंजिनची चाचणीही सुरू करण्यात येणार असल्याचेही सिवन यांनी सांगितले.

मी पदवीधर झालो तेव्हा संधी नव्हत्या
हिंदुस्थानात तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी आयआयटीपेक्षा दुसरी चांगली संस्था नाही. मी जेव्हा 30 वर्षांपूर्वी आयआयटी मुंबईमधून पदवीधर झालो तेव्हा आजच्यासारख्या अनेक संधी तेव्हा नव्हत्या. एखाद्या विषयात स्पेशलायजेशन करण्याबाबतही मर्यादा होत्या, पण आज अनेक संधी उपलब्ध आहेत. याशिवाय आजच्या काळात अस्थिरता, अनिश्चितताही वाढल्याचे सिवन म्हणाले. दरम्यान, आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडे सध्याच्या परिस्थितीशी लढण्याची क्षमता असल्याचेही सिवन म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या