
हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या शास्त्रज्ञांनी आपल्या अखंड कर्मयोगाच्या जोरावर आज विश्वविक्रम केला. चांद्रयान-3 च्या मदतीनं विक्रम लँडर या ऐतिहासिक क्षणानं हिंदुस्थानचं उर अभिमानानं भरून आलं आहे. आज संपूर्ण विश्वानं हा क्षण अनुभवला…
चांदोबा चांदोबा भागलास का?… चंदा मामा दूर के… अशा बालगीतांपासून चंद्र आहे साक्षीला… तोच चंद्रमा नभात… चाँद सिफ़ारिश जो करता हमारी… चंदा रे चंदा रे, कभी तो ज़मीं पर आ… अशा चित्रपटातील गाण्यातून हिंदुस्थानींचं चंद्राप्रतिचं आकर्षण कायमच पाहायला मिळालं आहे. हिंदुस्थानच्या भूमीत अवतार घेणाऱ्या प्रभु श्रीरामचं नाव देखील घेताना रामचंद्र असं म्हटलं जातं. इथल्या मातीच्या कणाकणात चंद्राची ओढ आहे. लहान मुलांना चंद्र दाखवून तो पाहा चांदोमामा म्हंटलं जातं, तर वयाची 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला सहस्रचंद्र दर्शन म्हटलं जातं. अशा चंद्रप्रेमी हिंदुस्थानं शास्त्रज्ञांच्या अखंड कर्मयोगानं अखेर चंद्रावर उतरत विश्व’विक्रम’ केला. साऱ्या विश्वाच्या नजरा ज्या ऐतिहासिक क्षणाकडे लागल्या होत्या तो यशस्वीरित्या पार पडला. हिंदुस्थानी अतंराळ संशोधन संस्था (ISRO-इस्रो)च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. हिंदुस्थानी शास्त्रज्ञांच्या प्रचंड मेहनतीला मिळालेलं हे यश आहे. यानिमित्ताने हिंदुस्थानची मान विश्वात उंचावली असून साऱ्या जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.




























































