
‘चांद्रयान-2’ मोहीम आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. त्यामुळे चंद्र आता अवघ्या काही पावलांवर आला आहे. एकीकडे चंद्राबद्दल जास्तीतजास्त माहिती जाणून घेण्याची संधी या मोहिमेमुळे सर्वसामान्यांना मिळणार आहे, तर त्याचवेळी इस्रोच्या बंगळुरू येथील संशोधकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. हे संशोधक आता या मोहिमेबद्दल काहीच बोलत नाहीत. फक्त ही मोहीम फत्ते व्हावी एवढीच त्यांची अपेक्षा आहे.
हिंदुस्थानच्या ऐतिहासिक ‘चांद्रयान-2’ मोहिमेबाबत इस्रोचे अध्यक्ष नुकतेच म्हणाले होते की, ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी आमच्या संशोधकांनी जेवढे प्रयत्न करायचे तेवढे केले आहेत. आतापर्यंत संशोधकांनी केलेल्या सांघिक प्रयत्नावरच या मोहिमेचे यश अवलंबून आहे. ज्येष्ठ संशोधकांनीही या मोहिमेबाबत पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. दशकभरापूर्वी ‘चांद्रयान-1’चे नेतृत्त्व केलेले इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी गुरुवारी म्हटले की, हिंदुस्थानसाठी हे दिवस महत्त्वाचे आहेत.
शनिवारी होणार लॅण्डिंग
‘चांद्रयान-2’ यानाचे लॅण्डर विक्रम आपल्या रोव्हर प्रज्ञानला घेऊन शनिवारी 7 सप्टेंबर रोजी रात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरणार आहे. इस्रोच्या या मोहिमेला यश मिळाले तर अमेरिका, रशिया आणि चीनपाठोपाठ चंद्रावर स्वारी करणारा हिंदुस्थान हा चौथा देश ठरणार आहे. चंद्राच्या अज्ञात असलेल्या दक्षिण ध्रुव भागात पाऊल ठेवणारा हिंदुस्थान हा पहिलाच देश ठरेल.





























































