त्वचेची काळजी घ्या- उशीचे कव्हर नियमित बदला

निरोगी, सुंदर त्वचेच्या शोधात किरकोळ दिसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष दिल्याने लक्षणीय फरक पडू शकतो. उशी नियमितपणे बदलणे हे एक साधे काम वाटते, पण ते प्रभावी परिणाम देऊ शकते.

तुम्ही खूप काळजी घेऊनही तुमच्या त्वचेवर मुरमे, लालसरपणा येणे, अशा समस्या उद्भवतात का? सर्व काळजी घेऊनही त्वचेची समस्या भेडसावत असेल तर अस्वच्छता हे कारण असू शकते.

रात्री झोपल्यावर आपली त्वचा सर्वात जास्त आपल्या उशीच्या संपर्कात येते. स्किनकेअर तज्ञ आठवडय़ाने उशीचे कव्हर बदलण्याचा सल्ला देतात. ही अगदी लहान बाब वाटत असली तरी तुमचे उशीचे कव्हर त्वचेच्या आरोग्यामध्ये आणि दिसण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

मुरमांपासून बचाव करण्यापासून ते त्वचेवर वळ उठण्यापर्यंत तुमची उशी नियमितपणे बदलण्याच्या छोटय़ाशा कामाचा त्वचेवर कसा मोठा परिणाम होऊ शकतो, याबद्दल लेझर विशेषज्ञ आणि स्किनफिनिटी डर्माच्या संस्थापक डॉ. इपशिता जोहरी यांनी माहिती दिली आहे.

मुरमांचा त्रास होतो कमी
तेल आणि त्वचेच्या पेशींमधून अडकलेल्या फॉलिकल्समुळे मुरमे होतात. तेलकट, बॅक्टेरियांनी भरलेल्या उशीवर विश्रांती घेतल्याने त्वचेला त्रास होऊ शकतो. उशी नियमित बदलल्याने मुरमांचा धोका कमी होऊ शकतो.

धूळ आणि तेल जमा
दिवसभर तुमच्या त्वचेवर धूळ, तेल आणि पर्यावरणीय प्रदूषक साचतात. त्वचेची अॅलर्जी होण्याची शक्यता वाढते. जेव्हा तुम्ही रात्री उशीवर डोके ठेवता तेव्हा हे पदार्थ त्वचेतून उशीच्या कापडावर जाऊ शकतात. कालांतराने धूळ आणि तेलाचा हा जमाव जिवाणूंसाठी प्रजनन भूमी बनू शकतो.

अॅलर्जीपासून सुटका
अस्वच्छ उशीमुळे त्वचेची जळजळ आणि अॅलर्जीदेखील होऊ शकते.

त्वचेचे हायड्रेशन राखणे
उशीचे फॅब्रिक त्वचेच्या हायड्रेशन स्तरावर परिणाम करू शकते. रेशीम किंवा सॅटिन पिलोकेस त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात.
>> मृणाल घनकुटे