
देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी बँकींग क्षेत्रावर जास्त भर देणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले होते. तसेच गैरव्यवहार रोखण्यासाठी बँकेतील प्रत्येक छोट्या मोठ्या व्यवहारांवर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच 1 सप्टेंबरपासून काही आर्थिक नियम बदलणार आहेत. त्याच्या दैंनदिन जीवनावरही परिणाम होणार आहे.
करदात्यांच्या बँकेतील प्रत्येक छोट्यामोठ्या व्यवहारावर नजर ठेवली जाणार आहे. कर भरणाऱ्यांच्या बँकेतील सर्व व्यवहारांची माहिती तपासली जाणार आहे. याआधी बँकेतून 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली तर त्याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागायची. आता या नियमात बदल करण्यात आला आहे. आता प्रत्येक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. वर्षाला बँक खात्यातून एक कोटींहून अधिक रक्कम काढल्यास त्यावर 2 टक्के जास्त टीडीएस भरावा लागणार आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक केले नसेल तर नवे पॅन कार्ड घ्यावे लागणार आहे. पेटीएम, गुगल पे यासारख्या ई- वॉलेटचा वापर करणाऱ्यांनी केवायसी दिली नसल्यास ई वॉलेट वापरता येणार नाही.
रेल्वेच्या वेबसाईटवरून तिकिट बुकिंग केल्यास अतिरिक्त सेवा शुल्क भरावे लागणार आहे. त्याचप्रमाणे वाहतुकीचे नियम पूर्वीपेक्षा कडक करण्यात आले आहेत. वाहतूक परवाना (लायसन्स) नसल्यास किंवा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास आता दहापट दंड मोजावा लागणार आहे. कार पार्किंग, क्लब मेंबरशिप यासारख्या सुविधांसह नवे घर खरेदी करताना जादा टीडीएस भरावा लागणार आहे. हे बदल 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.






























































