पीएफच्या पेन्शन नियमात बदल होण्याची शक्यता

2589

नोकरी करणाऱ्यांच्या वेतनातील ठरावीक रक्कम दर महिन्याला पीएफच्या स्वरुपात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफ) खात्यात जमा होत असते. भविष्यातील आर्थिक तरतूदीसाठी हा सर्वात सुरक्षित फंड मानला जातो. सेवानिवृत्तीनंतर या खात्यात जमा झालेल्या रकमेतून ठराविक रक्कम मासिक पेन्शन देण्यात येते. आता पेन्शनशी संबंधित नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम 6 कोटींपेक्षा जास्त ईपीएफ खातेधारकांवर होणार आहे.

एम्लॉयी प्रॉविडेंट फंड ऑर्गनायझेशन ( ईपीएफओ) एक नवा प्रस्ताव आणणार आहे. या प्रस्तावानुसार पेंन्शनसाठी वयाची मर्यादा 58 वरून 60 वर्षे करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, हा पर्याय सक्तीचा नसून वैकल्पिक असणार आहे, असे इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे. म्हणजेच 58 व्या वर्षी पेन्शन सुरू करायचे किंवा 60 व्या वर्षी याचा निर्णय खातेधारक घेऊ शकणार आहेत. या निर्णयामुळे पेन्शन फंडला होणारा तोटा 30 हजार कोटींनी कमी होणार आहे.

विविध ठिकाणी नोकरी केल्यानंतर किंवा नोकरीत बदल केल्यावरही 10 वर्षांपर्यंत नोकरी झाली असल्यास पेन्शन मिळणार आहे. सध्याच्या नियमाप्रमाणे वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ठराविक रक्कम मासिक पेन्शनच्या स्वरुपात मिळते. हा प्रस्ताव सुरुवातीला 2015 मध्ये आणण्यात आला होता. मात्र, तेव्हा सरकारने हा प्रस्ताव स्विकारला नव्हता. ईपीएफओच्या या प्रस्तावाला न्यायिक बोर्डासह श्रम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयाचीही परवानगी घ्यावी लागणार आहे. सध्या 60 लाख पेन्शनर असून तीन लाख कोटींचा पेन्शन फंड ईपीएफओकडे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या