प्रजासत्ताकदिनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांत गोंधळ, निवड करणारी संस्था ‘साइडिंगला’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

प्रजासत्ताकदिनी शौर्य पुरस्काराने देशभरातील शूर मुलांना गौरविण्यात येते. यंदाही या पुरस्कारांसाठी 21 मुलांची निवड करण्यात आली. पण या मुलांची निवड ज्या संस्थेने केली तिच्यासोबतच केंद्र सरकारचे फिसकटले आहे. गेली 60 वर्षे हे काम करणाऱया या संस्थेलाच बाजूला करून सरकारनेच 26 मुलांची निवड केली. यामुळे त्या 21 मुलांसमोर प्रश्नचिन्ह तर निर्माण झाले आहेच, शिवाय या पुरस्काराचे नाव बदलून त्यामध्ये पंतप्रधानांना आणण्यात आले आहे.

देशभरातील वीर मुलांची निवड करण्याचे काम हिंदुस्थान बाल विकास परिषदेकडून (आयसीसीडब्ल्यू) करण्यात येते, मात्र या संस्थेविरोधात निधीतील गैरव्यवहाराचे आरोप करीत केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने एफआयआर दाखल केला. या संस्थेला पुरस्काराच्या प्रक्रियेतूनही बाजूला करण्यात आले. मात्र या संस्थेने आधीच निवडलेली 21 मुले पुरस्कारासाठी दिल्लीत दाखल झाली आहेत. सरकारने निवडलेल्या 26 मुलांमध्ये आपली नावे आहेत किंवा आपल्याला प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सामील होता येईल का याबाबत या मुलांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतकेच नाही या शौर्य पुरस्काराचे नाव बदलून ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ असे करण्यात आले आहे. शौर्याबरेबरच अन्य क्षेत्रांतील गुणवंतांचाही या पुरस्कारामध्ये समावेश करण्यात आला आहे.

संस्थेविरोधात एफआयआर
‘आयसीसीडब्ल्यू’मध्ये 2015-16 साली पुरस्कारांचा शिल्लक राहिलेला 5 लाख 44 हजारांचा निधी परत केला नाही. त्याचप्रमाणे 2014-15 चा 83 लाख 99 हजार आणि 2015-16 चा दोन कोटी 19 लाख 70 हजारांचा शिल्लक निधीही परत न केल्याचा आरोप महिला व बालविकास मंत्रालयाने केला आहे. निधीचा अपहार केल्याचा आरोप करीत एफआयआर दाखल करण्यात आला.

शौर्य पुरस्काराचे स्वरूपच बदलले
शौर्य पुरस्काराचे स्वरूप बदलून त्यामध्ये अन्यही बाबींचा समावेश करण्यात आला आहे. नवीन शोध (सहा पुरस्कार), गुणवंत (तीन पुरस्कार), समाजसेवा (तीन पुरस्कार), कला आणि सांस्कृतिक (पाच पुरस्कार), क्रीडा (सहा पुरस्कार) आणि शौर्य (तीन पुरस्कार). महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवड समितीने 26 मुलांची या पुरस्कारासाठी निवड केली आणि ही मुले आता प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणार आहेत.