बोठेविरुद्ध पुरवणी आरोपपत्र अंतिम टप्प्यात, जूनच्या पहिल्या आठवडय़ात न्यायालयात सादर होणार; 30 जणांचे जबाब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेखा जरे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्याविरुद्धचा तपास अंतिम टप्प्यात असून, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध सुमारे 30 जणांच्या जबाबासह पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात हे आरोपपत्र सादर होण्याची शक्यता आहे.

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात रात्री 8च्या सुमारास हत्या झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी पाचजणांना पकडले होते. त्यांच्याकडील चौकशीत या खुनाचा सूत्रधार पत्रकार बाळ बोठे असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, त्यानंतर बोठे फरार झाला होता. तब्बल 102 दिवसांनी पोलिसांनी त्याला हैदराबादला पकडले. 12 मार्चला त्याच्यासह तेथील त्याच्या चार व नगरमधील एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे आता 90 दिवसांत या सर्वांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावयाचे आहे. त्यामुळे 12 जूनच्या आत ही प्रक्रिया ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी उपअधीक्षक अजित पाटील पूर्ण करणार आहेत.

12 मार्चला हैदराबादमधील बिलालनगर येथे एका हॉटेलमध्ये बोठे सापडला. त्याच्या समवेत तेथील वकील जनार्दन अकुला याच्यासह राजशेखर अजय चाकाली, शेख इस्माईल शेख अली व अब्दुल रहेमान अब्दुल अरिफ (सर्व रा. आंध्र प्रदेश) या चौघांना तसेच नगरमधील महेश वसंतराव तनपुरे (रा. नवलेनगर) अशा एकूण सहाजणांना पोलिसांनी अटक केली होती. या सर्वांविरुद्ध आता पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

मोबाईलचे अहवाल व रेल्वेच्या अधिकाऱयांचे जबाब प्रतीक्षेत

 बोठे व तनपुरे यांचे मोबाईल जप्त करून पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवले असून, त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. तसेच नगरमधून फरार झाल्यानंतर 3 ते 10 डिसेंबरदरम्यान नगरच्या रेल्वेस्थानकावर राहिल्याचे बोठेने पोलिसांना चौकशीत सांगितले आहे. त्याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी मिळून पाचजणांना जबाबासाठी बोलावले आहे. मात्र, अजूनही त्यांचे जबाब नोंदवले गेलेले नाहीत.