
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
उन्नाव बलात्कार प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर यांच्या नावाचा आरोपींमध्ये समावेश केला आहे. नोकरी मागण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सेंगर याने ४ जून २०१७ रोजी बलात्कार केला होता. आपल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत पीडीत मुलीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अपदित्यनाथ यांच्या घरासमोर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले होते.
सेंगर यांच्यावर अपहरण आणि पास्को कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. सेंगर यांच्यासह सीबीआयने आरोपपत्रात पाचजणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यात पीडितेच्या वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी सेंगरच्या भावाविरोधात आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यात झालेल्या मारहाणीमुळे पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. सीबीआयच्या आरोपपत्रात कुलदीपसिंह सेंगर, त्याचा भाऊ जयदीपसिंह सेंगर, विनीत मिश्रा, वीरेंद्र सिंह, राम शरणसिंह आणि शशीप्रताप यांची नावे आहेत. त्यांना सध्या लखनऊ कारागृहात ठेवण्यात आले आहे.
























































