तीन वर्षांनी कन्हैया कुमारविरोधात आरोपपत्र, पोलिसांकडून ट्रंकभर पुरावे कोर्टात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

तीन वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) केलेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीप्रकरणी कन्हैया कुमारसह दहा जणांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र सादर केले आहे. ट्रंकभर तब्बल 1200 पानांचे हे आरोपपत्र असून यावर उद्या (दि. 15) दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी होणार आहे.

आरोपपत्रात कन्हैया कुमारसह सय्यद उमर खलिद, अनिर्बान भट्टाचार्य, आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसुल, बशरत अली आणि खालिद बशीर भट या दहा जणांचा समावेश आहे.

थँक यू मोदीजी – कन्हैया कुमार
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्ली पोलिसांचे आभार मानतो. तीन वर्षांनंतर नेमके निवडणुकीच्या तोंडावर आरोपपत्र दाखल करण्यामागे राजकीय डाव आहे. पण माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. ‘थँक यू मोदीजी’ अशी प्रतिक्रिया कन्हैया कुमारने दिली आहे. मोदींकडे देशाने अच्छे दिन, 15 लाख रुपये, रोजगार मागितला होता. देशासाठी अच्छे दिन कधी येतील माहीत नाही पण निवडणुकीपूर्वी आरोपपत्र दाखल झाले. खरंच मोदींचे आभार, असे ट्विट कन्हैया कुमारने केले आहे.

देशद्रोहाचे आरोप
आरोपपत्रामध्ये कन्हैया कुमारसह 10 जणांवर 12 देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या 12 घोषणांचा आरोपपत्रात उल्लेख केला आहे. या प्रकरणातील व्हिडीओ आणि अन्य पुरावे फॉरेन्सिक आणि फेसबुक डेटाच्या माध्यमातून जमा केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आयपीसीच्या 124 अ, 323, 465, 143, 149, 147, 120 ब कलमांतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे.

काय आहे प्रकरण
9 फेब्रुवारी 2016 रोजी ‘जेएनयू’तील डाव्या विद्यार्थी संघटनेकडून अफजल गुरू याला फासावर लटकविले म्हणून मातम केला गेला आणि त्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
2016 मध्ये कन्हैया कुमार जेएनयूच्या विद्यार्थी संघाचा अध्यक्ष होता. या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी 10 फेब्रुवारीला हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि देशभरात खळबळ उडाली.
कन्हैया, उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य यांना अटक करून देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. कोर्टाने त्यांना जामीन दिला होता. तब्बल तीन वर्षांनी आरोपपत्र दाखल केले.