किलो से मिलो!

>> शेफ विष्णू मनोहर

बल्लवाचार्य विष्णू मनोहर. स्वयंपाकात सतत विविध प्रयोग हे त्यांचे वैशिष्टय़. आता लॉकडाऊन आणि अनलॉक काळातही त्यांनी स्वत:चे वेगळेपण जपले आहे.

सध्या मी ऑल इंडिया मेडिकल सायन्सच्या इथे कोविडग्रस्त लोकांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. दुसरं म्हणजे टू गो फॅसिलिटी जे काही पार्सलवाले आहे ते. रेस्टॉरण्ट सुरू आहेत पण तीस टक्केच व्यवसाय सुरू आहे. तो पुरेसा नाहीय. फक्त त्यातून तग धरून जगत आहोत. आमच्याकडे ज्यांनी वर्षानुवर्षे काम केले आहे, जे एवढी वर्षे माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडे काम करत आहेत त्यांचे अप्रत्यक्षरीत्या पालकत्व मी स्वीकारलेले आहे. ते पाळायचा मी प्रयत्न करतोय. अजून तरी परिस्थिती फारशी सुधारलेली नाहीय. लोक अजूनही बाहेरून पार्सल मागवायला धजावत आहेत.

या काळात आम्ही रेडिमेड भाज्या देणं बंद केल्या. आम्ही ग्रेव्हीजवर भर दिला. त्या ग्रेव्हीज रिटॉर्टने सीलबंद करायच्या. कोरोनावाला हात लागला तरी त्याला काही होणार नाही. घरी जा, पाकीट स्वच्छ धुवा मायक्रोववेला ठेवा किंवा गरम पाण्यात टाका. ग्रेव्ही काढा, तुम्हाला त्यात वाटेल ती भाजी घाला आणि त्याचा आनंद घ्या. ती ग्रेव्ही आम्ही किलोने विकतोय. त्यासाठी आम्ही ऑफरच काढली ‘किलोसे मिलो’. शिजलेला तांदूळ किलोने देत आहोत. एका किलोत साधारण दहा माणसे खाऊ शकतात. प्लेट सिस्टम नाही. आज माझ्याही खिशाला ते परवडत नाही. इतरांचीही तीच अवस्था आहे. कारण पगार अर्ध्यावर आलेले आहेत. त्यामुळे खर्च करण्याचीही आपली क्षमता नाही. आम्हाला विकतानासुद्धा विचार करावा लागतो. एक तर आम्ही अडचणीत आहोत. त्यात लोकांच्या खिशाला परवडेल म्हणून मग कमी करा. एकूण सगळं ढासळल्याने पुढचं एक वर्ष तरी अशीच परिस्थिती असणार आहे.

खरं तर लोक केवळ खाण्यापुरते रेस्टॉरण्टमध्ये येत नाहीत. तर त्यांच्यासाठी या ठिकणी येणं म्हणजे एक आनंद असतो. मित्रमैत्रिणींसोबत गप्पा, मजामस्ती, एकत्र भेटणं, खाता खाता अनेक आठवणींना उजाळा देणं असे हसत खेळत वेळ घालवण्यासाठी लोक यायचे. त्यामुळे आनंदी वातावरण वाटायचे पण आता ती उदासीनता जाणवते आहे. सुरुवातीला जेव्हा आम्ही रसोई बंद ठेवलं होतं तेव्हा लोक विचारायचे, तुम्ही का बंद ठेवले आहे. त्यावर मी म्हटलं, विष्णूजी की रसोई केवळ पोटभरण्यासाठी नाहीय, इथे त्यांना अनुभव मिळतो. वेगवेगळ्या वस्तू बघायला मिळतात. इथे समोर पाटावरवंटय़ावर मावशी मसाला वाटताना दिसतात. त्यापासून झुणका, भाजी बनते. समोर भाकऱया थापताना दिसतात, भाजी बनवताना दिसतात. धिरडे तुमच्या तव्यावर घातले जातात, हा अनुभव घ्यायला इथे लोक येतात. हे मी त्यांना थाळीत पॅक करून दिलं तरी इथल्या खाण्याची मजा त्यांना येणार नाही. प्रत्येक व्यावसायिकाला असंच वाटतं की आजच्यापेक्षा उद्या किती छान देऊ शकतो. ही प्रत्येक हॉटेल, रेस्टॉरण्ट व्यावसायिकाची मानसिकता असते. रसोईत आल्याबरोबर आठ दहा चटण्या दिसतात, कोशिंबिरी दिसतात. त्या आपण खातो किती त्याला महत्त्व नसते पण येताच क्षणी डोळ्यांसमोर दिसतं ते सुख असतं. पण ग्राहकांनी आता हे लक्षात घ्यायला हवं की आपण कुठल्या परिस्थितीत खातोय.

रेस्टॉरण्ट हवं तसं चालत नसल्याने आर्थिक परिस्थिती ढेपाळली गेली आहे, कुठे काटकसर करता येईल असा विचार करून आम्ही आमचा गुजारा करत आहोत. कोरोना काळात एक शिकायला मिळालं की आहे त्या परिस्थितीत जास्त छान काय करू शकतो. तर आम्ही पॅकिंग बदललं, खूप छान आकर्षक अशी बॅग घेतली. त्याच्याबरोबर सॅनिटायझर लावले. त्यानंतर जी रेसिपी पाठवतो त्या रेसिपीचा फोटो ती कुठली आहे, काय आहे आणि त्याची माहिती असे कार्ड दिले. जे त्यांना पुढेही जपून ठेवता येईल. काही वेळेला ग्राहकाला माणसांचा अंदाज येत नाही. किती लोकांसाठी किती पुरेल, अशा वेळी तो जास्त अन्न मागवतो त्यांना आम्ही सांगतो हे जास्त अन्न होईल. पुढच्या वेळी इथूनच मागवायचे असे त्यांना वाटेल. त्याचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम आहेत.

काय काळजी घेता..

  • किचनमध्ये तापमान बघतो आणि मगच आतमध्ये प्रवेश देतो.
  • मास्क बंधनकारक.
  • दाढी करणे.
  • हॅण्ड ग्लोज प्रत्येक दोन तासाला बदलणे.
  • भाज्या धुऊन घेतो. त्याच्यासाठी एक माणूसच कामाला लावला आहे.
  • स्टीमरचा पाइप काढून सगळ्या भाज्यांवर स्टीम फिरवतो.
  • जास्तीत जास्त स्वच्छता कशी ठेवता येईल याची खबरदारी घेतो.
आपली प्रतिक्रिया द्या