
सामना प्रतिनिधी । मुंबई
‘संजोना बिल्डर्स’चे मालक संजय अग्रवाल (57) यांनी त्यांच्या चेंबूर येथील कार्यालयात आत्महत्या केली. खासगी रिव्हॉल्व्हरमधून अग्रवाल यांनी डोक्यात गोळी मारली. चेंबूर येथे रखडलेल्या प्रकल्पामुळे आलेल्या नैराश्यातून अग्रवाल यांनी ही टोकाची भूमिका घेतली असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
चेंबूरच्या सिंधी कॉलनीत अग्रवाल यांचे कार्यालय आहे. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयात आले तेव्हा अग्रवाल यांचा मुलगा, मेहुणादेखील कार्यालयात होते. दरम्यान, 11.25 च्या सुमारास अग्रवाल यांच्या केबिनमध्ये गोळी झाडल्याचा आवाज आल्याने सर्वजण हादरले. सर्वांनी केबिनच्या आत धाव घेतली असता अग्रवाल रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. अग्रवाल यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचे उपाय्रुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान, चेंबूरच्या दहाव्या रस्त्यावर अग्रवाल यांचा एक प्रकल्प सुरू होता, पण तो खूप रखडल्याने ते प्रचंड नैराश्याच्या गर्तेत सापडले होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असे अग्रवाल यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. याप्रकरणी चेंबूर पोलीस अधिक तपास करीत आहेत. अग्रवाल यांनी 1999पासून सुनील गुप्ता यांच्या सोबत ‘संजोना बिल्डर्स’ ही कंपनी सुरू केली होती. त्याआधी ते ‘नूकेम इंडट्रीज’ या केमिकल सप्लाय करणाऱया कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर 20 वर्षे कामाला होते.































































